करमाळा तालुक्यातील शाळांना आरटीई मान्यता द्या – शिक्षक भारत संघटनेची मागणी

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी दिनांक ०१/०४/२०२२ ते ३१/०३/२०२५ या कालावधीसाठी आरटीई मान्यता नूतनीकरण प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती करमाळा येथे जमा केले आहेत. परंतु अध्याप पर्यंत तालुक्यातील बऱ्याच शाळांना मान्यता मिळालेल्या नाहीत. याविषयी शिक्षक भारती संघटनेने विचारणा केली असता, या कार्यालयात फक्त प्रस्ताव दाखल करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवल्याची नोंद आहे असे सांगण्यात आले. मान्यता वितरणाचे काम गटशिक्षणाधिकारी यांचे असल्याने तालुक्यातील शाळांना आरटीई मान्यता वितरित केल्या आहेत काय? अशी विचारणा संघटनेने केली असता कार्यालयाकडे याचे उत्तर नाही किंवा नोंद नाही असे सांगण्यात आले.

करमाळा तालुक्यातील काही शाळांनी वेतनेतर अनुदान आर टी ई मान्यते शिवाय मिळत नसल्याने स्वतः प्रयत्न करून सोलापूर येथे प्रत्यक्ष जाऊन प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातून मान्यता मिळविल्या आहेत. बऱ्याच शाळांना या कामात यश आले नाही. वरिष्ठ कार्यालयात तालुक्यातील मुख्याध्यापक किंवा लिपिक यांनी हेलपाटे घातल्यानंतर त्यांना “तुमच्या शाळेची फाईल आमच्या कार्यालयात नाही आमच्या संगणकात नोंद नाही.”असे सांगितले जाते. यामुळे निकष पूर्ण करणाऱ्या व प्रस्ताव दाखल केलेल्या शाळांना आरटीई मान्यता मिळत नाहीत.

यामुळे शिक्षक भारती संघटना करमाळा यांनी गटशिक्षणाधिकारी यांना तालुक्यातील सर्व शाळांच्या आरटीई मान्यतांचे वितरण करणे विषयी निवेदन दिले आहे. तसेच याबाबतची कार्यवाही तात्काळ न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

“आरटीई ऍक्ट २००९ नुसार ज्या शाळांना आरटीई मान्यता नाही किंवा नूतनीकरण झालेले नाही, अशा शाळा अनधिकृत आहेत. कार्यालयीन दप्तर दिरंगाईमुळे निकष पूर्ण करणाऱ्या तालुक्यातील शाळा अनधिकृत ठरत आहेत. याकरिता तात्काळ मान्यता वितरित झाल्या पाहिजेत.”-

विजयकुमार गुंड. जिल्हा प्रवक्ता शिक्षक भारती सोलापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!