केम परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत – अनेक शेळ्या,कोंबड्या केल्या फस्त – गुरांचे कान तोडले
केम (प्रतिनिधी- संजय जाधव) :केम (ता.करमाळा) परिसरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून आतापर्यंत त्यांनी सात शेळया, पाच कोकरू व वीस ते पंचवीस कोंबड्या फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी प्रशासनाने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
यामध्ये सात ते आठ मोकाट कुत्र्यांचे टोळक आहे. हे टोळक अचानक चरत असलेल्या शेळ्यांवर, कोकरावर,कोंबड्यांवर व बसलेल्या जनावरांवर हल्ला करत आहेत. ते आता रक्ताला चटावलेले आहेत.
सध्या पावसाळ्यात माळरानावर गुरांना चरण्यासाठी गवत उगवलेले असल्याने त्यामुळे गुराखी शेळया सोडून देत आहे. अशा वेळेस अचानक हे टोळक येऊन शेळ्यांवर व कोकरावर हल्ला करून खात आहेत. तसेच वस्त्यांवरील सोडलेल्या कोंबडया अचानकपणे येऊन फस्त करत आहेत. याचबरोबर बसलेल्या जनावरांच्या कानाला चावा घेऊन कान खाल्ले आहेत.
यामध्ये खानट वस्तीवरील शेतकरी नागनाथ खानट यांची एक शेळी, बजरंग देवकर यांचे एक कोकरू, महादेव इंगळे यांचे एक कोकरू, नागनाथ दौड यांच्या दहा कोंबड्या चांभारवाडी येथील हनुमंत शिंदे, हरिदास शिंदे, बंडू शिंदे यांच्या कोंबड्या तर भोगेवाडी,घुटकेश्वर परिसरातील शेतकरी ज्ञानदेव काळे या़चे कोकरू, महादेव शिवणे यांची एक शेळी, तानाजी काळे यांचे एक बोकड, मारूती काळे यांची एक शेळी, मोहन जगताप यांची एक शेळी या कुत्र्यांच्या टोळक्याने खाल्ले आहे.
लिमोणी मळयातील बागायतदार भागवत तळेकर यांच्या खोंडाचा कान खाल्ल्या आहे. याचबरोबर घुटकेश्वर वस्तीवरील मंगेश बीचीतकर यांच्या लहान रेडीचे देखील कान खाल्ले आहेत. रानात घुसून पिकांची देखील नासाडी हे टोळकं करत आहे.
या कुत्र्यांच्या टोळक्याने दहशत बसविली असून केम परिसरात वाडया वस्त्यांवर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे हल्ले बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत। त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असी मागणी केम परिसरातून होत आहे.