खेळ पैठणीचा आज पुन्हा – त्याच जागी सायं 5 ते 10 यावेळेत होणार
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.१४: प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी काल (ता.13) मकर संक्रांती निमित्त करमाळ्यात शनिवारी आयोजित क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत ‘होम मिनिस्टर- खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम करमाळा पोलिसांनी नियमानुसार रात्री दहा वाजता बंद केला. त्यामुळे महिला नाराज झाल्या .असे असलेतरी महिलांच्यासाठी हाच कार्यक्रम रविवार दि. १४ रोजी सायं. ५ ते
१० पुन्हा हा कार्यक्रम होणार असल्याचे श्री. जगताप यांनी जाहीर केले.
काल खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सुरू होण्यास उशीर झाला. उपस्थित महिलांना पैठणी दिली जाणार हे संयोजकांनी जाहीर केले असल्याने महिलांची प्रचंड गर्दी झाली होती. करमाळा शहरातूनच नव्हेतर माढा मतदार संघातील वेगवेगळ्या ठिकाणांहून महिला आल्या होत्या.आयोजकांनी सुरक्षेची पूर्ण काळजी घेत कार्यक्रम स्थळी तब्बल चार एकर बंदीस्त जागेत अल्पोपहाराची आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.
‘खेळ पैठणीच या कार्यक्रमाची सुरुवात कु. सह्याद्री मळेगावकर हीने बहारदार केली. त्यानंतर उद् घाटनात वेळ गेला. यानंतर क्रांतीनाना मळेगावकर यांनी उखाणे घेत मजेदार खेळ सुरू केला.महीलांचा उत्साह वाढत गेला , हा कार्यक्रम ऐन रंगात आला आणि पोलीसांनी नियमानुसार दहा वाजता कार्यक्रम बंद करण्याची सूचना दिली.
त्यानंतर ‘दहा वाजून दहा मिनिटांनी ‘ हा कार्यक्रम बंद करण्यात आला.
त्यानंतर उपस्थित महिलांना संयोजकांकडून पैठणीचे वाटप केले. तरीही महिलांचा उत्साह पाहून श्री. जगताप यांनी पुन्हा कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.