अंधारात दबा धरून बसणाऱ्या तरूणास अटक..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : अंधारात आपले अस्तित्व लपवून बसलेल्या तरूणास पोलीसांनी अटक केली आहे. हा प्रकार १५ जानेवारीला रात्री साडेअकराच्या सुमारास जेऊर येथील शेटफळ चौकात घडला आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तौफिक रज्जाक काझी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की १५ जानेवारीला आम्ही गस्त घालत असताना जेऊर येथील शेटफळ चौकालगत शिवपार्वती ॲग्रो खताच्या दुकानच्या पाठीमागे अंधारात एक माणूस लपून बसला होता. आम्ही त्याच्याकडे जात असताना तो पळून जावू लागला. त्यानंतर त्यास पकडले असता, तो योगेश राजा काळे (रा. केडगाव) असे असल्याचे समजले. त्याच्यावर मुंबई पोलीस कायदा १२२ ब प्रमाणे पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साने हे करत आहेत.