कुंभेज फाटा येथे दोन मोटारसायकलींच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तिघेजण गंभीर जखमी

करमाळा(दि.१४): कुंभेज फाटा येथे दोन मोटारसायकलींच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या बार्शी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील एकाचा काल उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

दि. 11 मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कुंभेज फाटा ते कुंभेज रस्त्यावर कुकडी कॅनॉलजवळ हा अपघात घडला. मोहन भागवत कादगे (वय 50) व त्यांची पत्नी कालींदा मोहन कादगे (वय 40, रा. कुंभेज) हे हिरो होंडा स्प्लेंडर (क्रमांक MH-45-K-5919) वरून गावाकडे परतत असताना, समोरून येणाऱ्या सचिन साहेबराव शिंदे (रा. कुंभेज) यांच्या दुचाकी (MH-45-AJ-6480) ने जोरदार धडक दिली.

धडक इतकी जोरदार होती की तिन्ही जण रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच भागवत गोपाळ कादगे घटनास्थळी धावले व नंतर पुतण्या भारत यांच्या मदतीने जखमींना शहा हॉस्पिटल, करमाळा येथे दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना बार्शी येथील भगवंत हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तिघांनाही बेशुद्ध अवस्थेत उपचार सुरू केले. यात मोहन कादगे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

या घटनेबाबत भागवत कादगे यांनी करमाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सचिन साहेबराव शिंदे यांच्याविरुद्ध निष्काळजी व वेगात वाहन चालवून अपघात घडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.




