केमच्या सरपंचपदासाठी महिलांमध्ये दुरंगी लढत
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे. यात केम ग्रामपंचायतीचा देखील समावेश आहे. केम ग्रामपंचायत ही तालुक्यातील एक मोठी ग्रामपंचायत असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
केम ग्रामपंचायतीमध्ये एकूण १७ सदस्य असून एकूण सहा प्रभाग आहेत. मतदार संख्या सुमारे ७४११ आहे.यावेळेस सरपंच पद हे जनतेतून निवडले जाणार असून सरपंचपद हे महिला ओ.बी.सी. साठी राखीव आहे. श्री ऊत्तरेश्वर परिवर्तन पॅनेलकडून मनीषा बाळासाहेब देवकर व सत्ताधारी अजितदादा तळेकर गटाकडून सारिका राहुल कोरे यांच्यात सरपंच पदासाठी दुरंगी लढत होणार आहे.
मनीषा देवकर या केम विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब देवकर यांच्या पत्नी आहेत. बाळासाहेब देवकर यांचा शेतकऱ्यांशी दांडगा संपर्क आहे. सारिका कोरे या अजितदादा तळेकर गटांचे निष्ठावंत कार्यकर्ते राहुल कोरे यांच्या पत्नी आहेत. राहुल कोरे हे टिळक मित्र मंडळाचे कार्यकर्ते आहेत. त्यांचा सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग असतो.
या निवडणूकीत सरपंच पदाबरोबर प्रभाग क्र. ४ कडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या प्रभागामध्ये सत्ताधारी गटाचे नेते व मोहिते पाटील गटाचे निष्ठावंत अजितदादा तळेकर हे निवडणुकीस उभे आहेत तर त्यांच्या विरोधात श्री ऊत्तरेश्वर परिवर्तन पॅनेलकडून प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर हे प्रथमच या निवडणुकीत आपले नशिब आजमावत आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये अजितदादा तळेकर यांची १५ वर्ष एक हाती सत्ता राहिली आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवसेनेने एकही उमेदवार दिला नसून सध्या तटस्थ राहण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. तरी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी अजून चित्र स्पष्ट होईल.