भ्रष्टाचारमुक्त गाव करण्यासाठी परिवर्तन करा - राजेंद्र बारकुंड - Saptahik Sandesh

भ्रष्टाचारमुक्त गाव करण्यासाठी परिवर्तन करा – राजेंद्र बारकुंड

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : चिखलठाण ग्रामपंचायतीमध्ये अनागोंदी कारभार चालू असून दडपशाही व हुकूमशाहीचे राजकारण चालू आहे. या गोष्टीला पायबंद घालण्यासाठी व व्यसनमुक्त गाव

करण्यासाठी चिखलठाण ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन आवश्यक आहे; असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी व्यक्त केले आहे. चिखलठाण ग्रामपंचायतीमध्ये माजी आमदार नारायण पाटील व बागल गटाची युती झाली असून या युती मार्फत ही निवडणूक लढवीत आहोत. मी जरी आमदार संजयमामा शिंदे गटाचा कार्यकर्ता असलोतरी गावपातळीवर आम्ही या निवडणुकीत एकत्रित काम करत आहोत. आत्तापर्यंत विरोधकांनी सत्तेत राहून ग्रामपंचायतीवर एकाधिकारशाही, हुकूमशाही व दडपशाहीचे राजकारण केले आहे. गावातील कोणतेही निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन करायची असतात.

परंतु विरोधकांनी मात्र तसे न करता हम करे सो कायदा.. याप्रमाणे कारभार केला आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी असून त्याचा फायदा आम्हाला या निवडणुकीत होत आहे. यावेळी मात्र विकास गलांडे यांच्या पत्नी सौ. धनश्री विकास गलांडे सरपंच पदासाठी उभ्या असून त्या सर्वसमावेशक उमेदवार आहेत. तसेच ग्रामपंचायत सदस्यांनाही विश्वासात घेऊन उमेदवारी देण्यात आली आहे. बागल-पाटील गटाच्या युतीमुळे आमच्या पॅनलची बाजू भक्कम झाली असून यावेळी मात्र परिवर्तन अटळ आहे; असाही विश्वास बारकुंड यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, की.. भ्रष्टाचारमुक्त कारभार करणे हे आमचे ध्येय असून ते आम्ही पूर्ण करणार आहोत. तसेच व्यसनामुळे अनेक घरांचे प्रपंच उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण गाव व्यसनमुक्त करण्यावर आमचा भर राहणार आहे. स्पर्धापरीक्षेच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी स्वतंत्र अभ्यासिका निर्माण करणार आहोत.

तसेच अत्याधुनिक व्यायामशाळा, रस्ते, गटारी व शासकीय योजनांचा पुरेपूर फायदा गावाला करून देण्यावर आमचा भर राहणार आहे. शेतकऱ्यांचा कल फळबागांकडे जास्त असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी कोल्ड स्टोअरेजची उभारणी करण्याचा आमचा मनोदय असून चिखलठाणचे ग्रामदैवत कोटलिंग मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यावर आमचा भर राहलि; असेही श्री. बारकुंड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!