लग्नाच्या नावाखाली २० वर्षांच्या युवतीकडून दोघांची फसवणूक

करमाळा(संदेश प्रतिनिधी) – सध्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे चित्र असून याचा फायदा घेत फसवणुकीचे नवनवीन प्रकार रोज समोर येत आहेत. असाच एक प्रकार सध्या करमाळा तालुक्यात घडला आहे. वीस वर्षाच्या युवतीचा वापर करून एका कुटुंबाने २ युवकांची फसवणूक केली असून तिसऱ्या युवकाची फसवणूक केल्याची शक्यता आहे. पहिल्या पतीसोबत एक महिना तर दुसऱ्या सोबत २ महिने राहिल्यानंतर सदर महिला माहेरी निघून गेली ती परतलीच नाही.
यासंदर्भात गुळसडी (ता.करमाळा) येथील सुनिल गणपत भोसले (वय ३२) यांनी ५ ऑक्टोबरला करीना राजेंद्र चव्हाण (वय २०), राजेंद्र सोपान चव्हाण (वय ४५), सौ. कुसूम राजेंद्र चव्हाण (वय ४०), सिध्दार्थ राजेंद्र चव्हाण (वय २४) राहुल रामदास कांबळे (वय ३२), आजिनाथ सिताराम चव्हाण (वय ४५) सर्व रा.पिंपळवाडी ता.करमाळा जि. सोलापूर अशा ६ जणांच्या विरोधात करमाळा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 2022 मध्ये मी माझ्या लग्नासाठी मुलीच्या शोधामध्ये होतो. अशावेळी माझी भेट माझे मित्र राहुल रामदास कांबळे (वय 32) यांच्याशी झाली. त्यावेळी “तुमच्या पाहुण्यापैकी कोणी मुलगी असल्यास मला सांगा” असे राहुल कांबळे यास मी सांगितले. त्यावेळी राहुल कांबळे म्हणाला की, माझी मेव्हणी करीना हिचा विवाह करण्याचा आहे. मी माझे सासरे राजेंद्र चव्हाण व सासू कुसूम चव्हाण यांना याबाबत विचारतो त्यानंतर दि. 15/06/2022 रोजी करीना हिस पाहण्यासाठी पिंपळवाडी येथे बोलविले व बघण्याचा कार्यक्रम केला.
मला मुलगी पसंत झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी मला सांगितले की जर तुम्ही आम्हांस सदर लग्नासाठी 5 लाख रुपये दिले तरच आम्ही करीनाचा विवाह तुमच्याशी करून देवू त्यावेळी मी त्यांना म्हणालो की, माझी ऐवढे पैसे देण्याची ऐपत नाही. मी तुम्हांला 3 लाख रू देवू शकतो. संशयित त्यांनी ही गोष्ट मान्य केली. त्यानंतर मी तात्काळ माझ्या जवळील रक्कम रू 2 लाख व पाहुण्यांकडून रक्कम रू 1 लाख उसणवार घेवून 18/06/2022 रोजी पिंपळवाडी येथे त्यांच्या राहत्या घरी 3 लाख रुपये रोख स्वरूपात दिले.

दि. 20/06/2022 रोजी माझे आळंदीदेवाची येथे रिध्दी सिध्दी मंगल कार्यालयात करिनासोबत बौध्द धर्म पध्दतीने विवाह झाला. लग्नावेळी करिनाला सोन्याचा नेकलेस, सोन्याचे मनीमंगळसुत्र, सोन्याचे गंठण घातलेले होते. विवाहानंतर करीना गुळसडी येथे नांदावयास आली पुढे दोन महिने पत्नी या नात्याने राहू लागली परंतु त्यानंतर तिच्या माहेरील लोकांनी तिला तू इकडे निघून ये तुला नवीन पैशावाला नवरा करून देऊ. असे सांगण्यास सुरवात केली. दि. 25/08/2022 रोजी मी कामावर गेलेलो असतांना करिनाच्या माहेर कडील लोक गुळसडी येथे आले व त्यांनी कोणतीही पुर्व कल्पना न देता माझ्या संमतीशिवाय करिनाला माहेरी पिंपळवाडी येथे घेवून गेले.
या घटनेनंतर मी पिंपळवाडी येथे करिनाला नांदण्यास आणण्यासाठी गेलो. परंतु सदरवेळी तिच्या माहेरील लोकांनी ती घरी नाही म्हणून मला माघारी लावले. त्यानंतर मी सतत त्यांचे पै पाहुणे यांचेमार्फत करिनाला नांदवण्यास आणण्याबाबत बरेचदा प्रयत्न केले परंतु ती नांदवण्यास आली नाही.
दि. 01/08/2023 रोजी सचिन गजरमल, रा.कुळधरण ता.कर्जत जि. अहमदनगर हे माझ्या घरी गुळसडी येथे आले व त्यांनी मी करिनाचा पहिला पती असल्याचे सांगितले व तिच्या सोबत माझा दि. 26/06/2020 रोजी कुळधरण
ता. कर्जत येथे विवाह झाल्याबाबत सांगितले तसेच विवाहातील पती पत्नीचे फोटो देखील दाखविले. तसेच माझ्याकडून देखील लग्नाला ३ लाख रुपये घेतले व लग्नानंतर एक महिन्यातच करीना घर सोडून माहेरी पिंपळवाडीला निघून आली.

या गोष्टी समजल्यावर आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यावर मी तात्काळ पिंपळवाडी येथे करिनाच्या घरी गेलो. घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला असता ते सर्वजण मला म्हणाले की, आमचा हा फसवणूकीचा धंदा आहे आम्ही करीना हिचा विवाह केवळ पैश्यासाठी तुमच्या सोबत लावलेला होता आता आम्हांला तुझी गरज नाही आम्ही सध्या करीना हिचा विवाह दुस-या पुरूषाशी लावून दिलेला आहे. त्यामूळे तू यापुढे येथे आलास तर तुला खलास करून टाकीन अशी जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सदरील व्यक्तींनी आपली फसवणूक व विश्वासघात केल्याने मी करमाळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने हे याविषयी अधिक तपास करत आहेत.
