शहीद नवनाथ गात स्मारक समितीची दोन दशकांची वाटचाल – २१०० रक्त बाटल्यांचे संकलन – शेकडो गुणीजणांचा सन्मान..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी : 

करमाळा : वरकुटे येथील शहिद जवान नवनाथ गात स्मारक समितीने गेल्या २० वर्षात अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. आत्तापर्यंत २१०० रक्तबाटल्यांचे संकलन केले असून, विविध क्षेत्रातील शेकडो गुणीजनांचा सन्मान केला आहे. स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय, शहिद जवान नवनाथ गात यांचे जिल्ह्यातील एकमेव प्रशस्त व भव्य पुतळ्यासह स्मारक, सुशोभित परिसर आणि ग्रंथालयाची इमारत असे वेगवेगळे आकर्षण असणारे हे स्मारक आहे.

२ मार्च २००३ रोजी शहिद जवान नवनाथ गात हे देशसेवेत असताना शहिद झाले होते. त्यानंतर ग्रामस्थ तसेच निळकंठ ताकमोगे, नागन्नाथ गात, सचिन हंडे, सचिन गाडेकर आदींनी एकत्रित येऊन शहिद जवान गात स्मारक समिती स्थापन केली. या समितीतून प्रतिवर्षी २ मार्च ला विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. याशिवाय किर्तन, प्रवचन, गुणवंतांचा सन्मान, शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध स्पर्धा, नृत्य स्पर्धा, क्रिडा स्पर्धा, विज्ञान स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच प्रतिवर्षी शहिद जवान मातापित्यांचा सन्मान, आजी-माजी सैनिकांचा मेळावा असे उपक्रम राबविले जातात. यावर्षी दोन दशक पूर्तीनिमित्त स्मारक समितीने भव्य कुस्त्यांचा आखाडा भरवला होता. यासाठी पाच लाख रू. मल्लांना भेट म्हणून दिले आहेत. 

वरकुटे येथील भव्य प्रांगणात सायंकाळी सहा वाजता कुस्तीचा आखाडा भरविण्यात आला. यावेळी कुस्ती सम्राट अस्लम काझी, पं.स.चे माजी सभापती शेखर गाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कुस्तीतील प्रथम विजेता शिवछत्रपती संकुल पैलवान महारूद्र काळे यांनी स्मृतीचिन्ह व रू. १ लाख ११ हजार १११ रू. बक्षीस मिळविले. यावेळी सहाशे पैलवानांनी सहभाग नोंदवला. कुस्तीचे सुत्रसंचलन पै.राजाभाऊ देवकते यांनी केले. यावेळी संजय राऊत, लक्ष्मण शिंदे, रामराजे डोलारे, पै. आबा मस्तुद, तानाजी बेडकुते, गणेश भांडवलकर, लक्ष्मण आबा शिंदे, स्वप्नील हंडे, नयन मस्के, रोहिदास मोगल यांनी परिश्रम घेतले.

मुख्य कार्यक्रमासाठी सैनिक संघटनेचे अध्यक्ष आक्रुड शिंदे, सरपंच दादासाहेब भांडवलकर, सदस्य अनिल बाबर, गुरूकुल स्कुलचे संस्थापक अध्यक्ष नितीन भोगे उपस्थित होते. यावेळी अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम राबविल्याबद्दल शहिद जवान नवनाथ गात स्मारक समितीचे अध्यक्ष नागन्नाथ गात यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्मारक समितीच्या वतीने बालाजी बाबर, गोपीनाथ बेडकुते, अनिल बेडकुते, विठ्ठल जगताप यांनीही परिश्रम घेतले. कुस्तीमध्ये उपविजेता अक्षय मंगवडे ठरला आहे.

शहिद जवान नवनाथ गात स्मारक समितीने गेल्या दोन दशकात विविध सामाजिक उपक्रम राबविले असून यापुढेही या समितीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतील. तालुक्यातील नागरीकांचे पाठबळ आणि सदीच्छा आवश्यक आहेत… …नागन्नाथ गात (अध्यक्ष) …निळकंठ ताकमोगे (सचिव)

२ मार्च २०२३ रोजी आयोजित केलेल्या स्मारक समितीच्या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार पक्षीमित्र शिक्षक कल्याणराव साळुंके, मरणोत्तर शौर्य पुरस्कार शहिद जवान आप्पासाहेब काटे, क्रिडा क्षेत्रातील पुरस्कार कु. वैष्णवी कुमार पाटील व आदर्श शाळा शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार जिल्हापरिषद प्राथमिक शाळा गोयेगाव यांना देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड.बाबूराव हिरडे हे होते. प्रमुख पाहूणे म्हणून साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल – कोलते, यशकल्याणीचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभुराजे जगताप, आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष आक्रुड शिंदे, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, देविदास ताकमोगे सर, समाधान दोंड आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी ह.भ.प.स्वप्नील महाराज शिंदे यांचे किर्तन झाले तसेच रामभाई शहा रक्तपेढी बार्शी व कमलाभवानी रक्तपेढी करमाळा यांचे वतीने रक्तसंकलन करण्यात आले. यावेळी १११ जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव निळकंठ ताकमोगे, सुत्रसंचालन सचिन गाडेकर, आभार सचिन गात यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!