‘उजनी’ची पाणीपातळी खाली..खाली..- सध्या उणे 53.09% पाणीसाठा – पाणीटंचाईचे सावट..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : सोलापूर, पुणे, अहमदनगर व धाराशिव या चार जिल्ह्यासह उजनी परिसरातील शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या उजनी जलाशयाची पाणी पातळी खोल-खोल जात आहे. लवकरच हे धरण निचांकी पातळी गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या या धरणात उणे ५३.०९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे पाणीटंचाईचे सावट गडद झाले असून, करमाळा शहरासह तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनेवर व शेतीवर परिणाम झाला आहे.

राज्यात जायकवाडीनंतर उजनी हे महाराष्ट्रातील दुसरं सर्वात मोठं धरण आहे. गेल्या अनेक वर्षापासून शेतीची व जिल्ह्यातील नागरीकांची तहान भागविण्याचे काम उजनी करत आहे. या उजनी धरणात गेल्यावर्षी जानेवारी २०२३ मध्ये शंभर टक्के पाणीसाठा होता. यावर्षी २१ जानेवारी २०२४ ला जिवंत पाणीसाठा संपला असून, आत्तापर्यंत उणे ५३.०९ टक्के पर्यंत पाणीसाठा गेला आहे. जानेवारी महिन्यापासून उजनीच्या मृत साठ्यावर सोलापूर, पुणे, अहमदनगर या भागातील शेती व पिण्याच्या पाण्याची सोय केली जात आहे.

गेल्यावर्षी कमी पावसाने धरण फक्त ६० टक्के भरले होते, प्रशासनाने योग्य नियोजन केले असतेतर ही पाळी आली नसती. १० मे २०२४ पासून सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडा; असा जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी आदेश दिल्याने सोलापूर शहरासाठी पाणी जात आहे. असेच पाणी जात राहिलेतर लवकरच धरणातील पाणीसाठा उणे ६० टक्के पर्यंत जाईल व ही पातळी निचांकी पातळी ठरली जाणार आहे. यापूर्वी ३० जून २०१९ ला उणे ५८ टक्के पाणी गेले होते. तेव्हा ती निचांकी पातळी ठरलेली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!