कुकडीपेक्षा मांगी तलावात उजनीच्या पाण्याचा पर्याय महत्त्वाचा आहे – आमदार संजयमामा शिंदे..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : उजनी धरणातील केतुर व वाशिंबे येथून योजना कार्यान्वित करून मांगीसह जातेगाव, कामोणे, कुंभारगाव, सावडी या परिसराला पाणी कायमस्वरूपी मिळू शकते, यासाठी गेल्या दीड वर्षापासून प्रयत्न सुरू असून याला शासनाची तत्त्वतः मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे मांगी तलावात कायमस्वरुपी पाणी आणण्यासाठी कुकडी पेक्षा उजनी धरणाचा पर्याय महत्त्वाचा आहे. अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यातील 108 गावातील समस्या जाणून घेण्यासाठी गाव भेट दौरे सुरू केले आहेत. पांडे गटात त्यांनी आपला दौरा केला असून, या गटातील समस्या जाणून घेतले आहेत. पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन कुठलेही राजकारण टीका टिपणी न करता अडचणी आपण सोडवणार आहोत.
यावेळी पोथरे येथील ग्रामस्थांनी मांगी तलावात कायमस्वरूपी पाण्याची मुख्य समस्या मांडली. यावर बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, कुकडीचे पाणी करमाळ्याला येणे ही खूप अवघड बाब आहे. यासाठी केतुर पासून एक उपसा सिंचन सुरू करून कुकडीच्या कॅनलमध्ये ते पाणी टाकायचे व वाशिंबे पासून दुसरी योजना सुरू करून पोंधवडी येथे बोगदा करून रेटेवाडी येथे टाकून ते पाणी मांगी परिसरात आणायचे. या दोन्ही योजना सुरू केल्या तर तालुक्यातील उत्तर भागासह कुंभारगाव सावडी परिसरात कायमस्वरूपी पाणी होऊ शकते. याचा सर्वे आपण केला असून याला तत्वतः मान्यताही मिळाली आहे. लवकरच याचा रिझल्ट आपल्यासमोर येणार आहे. याप्रसंगी पोथरे गावातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.