उत्तम हनपुडे यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचा “आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यातील गौंडरे येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील सहशिक्षक उत्तम हनपुडे यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात “आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.

पालघर येथे आयोजित अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, एबीपी माझाचे संपादक प्रसन्न जोशी, पालघरचे आमदार राजेंद्र गावित, आमदार निरंजन डावखरे व आमदार राजेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हनपुडे सरांना हा पुरस्कार मिळाला आहे. या अधिवेशनात टीडीएफचे अध्यक्ष जी. के. थोरात, स्वागताध्यक्ष नरसू पाटील, कार्यवाहक पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे व इतर राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.

उत्तम हनपुडे यांनी केवळ शैक्षणिकच नाही तर सामाजिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी गावात ग्राम स्वच्छता अभियान राबवले तसेच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गौंडरे गावाला आदर्श गाव म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. १९९८ ते २००२ दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेच्या आदेशाने त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य केले.
सामाजिक बांधिलकीतून प्रेरित होऊन त्यांनी वधू-वर सूचक केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत २१८ विवाह आणि १३ पुनर्विवाह जुळवले, तेही कोणतीही फी न घेता पूर्णपणे नि:स्वार्थ भावनेतून.

शाळेतही वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, पक्षी निरीक्षण यांसारखे उपक्रम त्यांनी यशस्वी राबवले. “माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमात त्यांच्या शाळेला पुणे विभागात तृतीय क्रमांक प्राप्त झाला. तसेच शिक्षक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यातही मोलाचे योगदान दिले. याच सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.



