“वळूनी पाहिलं” आत्मचरित्राचे प्रकाशन – 90 वर्षीय आजीच्या हस्ते साधेपणात संपन्न सोहळा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक सर्जेराव (एस.डी.) विधाते लिखित आत्मचरित्र “वळूनी पाहिलं” या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे, एक आगळावेगळा आणि भावस्पर्शी सोहळा ठरला.
या प्रकाशन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे – ९० वर्षीय आजी श्रीमती मालन उत्तमराव विधाते यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. आपल्या चुलत आजीच्या हातून पुस्तकाचे प्रकाशन व्हावे, ही कल्पना आणि भावनाशीलता सरांच्या कुटुंबप्रेमाची साक्ष देणारी ठरली.
पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम कोणत्याही झगमगाटाविना, पूर्णतः घरगुती व साध्या वातावरणात पार पडला. विधाते कुटुंबातील पुरुष व महिला मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग हे कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरले. या कार्यक्रमाला राजलक्ष्मी बोअर वेलचे मालक राजेंद्र काळे यांनी विशेष उपस्थिती होती.
“वळूनी पाहिलं” या आत्मचरित्रामध्ये सर्जेराव विधाते सरांनी आपल्या जीवनातील संघर्ष, शिक्षकी पेशातील अनुभव, समाजातील निरीक्षणे आणि कुटुंबातील नाती यांचे संवेदनशील आणि वास्तव चित्रण केले आहे. त्यांनी ३३ वर्षांची शिक्षक सेवा महात्मा गांधी विद्यालय, करमाळा येथे केली असून, त्या काळातील अनुभव, विचार, आणि शिक्षण क्षेत्रातील बदल यांचा मागोवा त्यांनी प्रामाणिकपणे या पुस्तकात घेतला आहे.
नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारे लेखन स्वतः बोलताना सर्जेराव विधाते सरांनी सांगितले, की “आजच्या तरुण पिढीला जीवनाकडे बघण्याचा नवदृष्टीकोन मिळावा, प्रेरणा घ्यावी, आणि स्वतःचं आयुष्य समृद्ध करावं यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. प्रत्येक नवोदित युवक-युवतीने हे आत्मचरित्र नक्की वाचावे.”
कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या हस्ते प्रकाशन घडवून आणत शिक्षकाच्या भूमिकेइतकेच घरातील सदस्य म्हणून साजरा होणारा हा कृतज्ञतेचा सोहळा एक आदर्श ठरतो. “वळूनी पाहिलं” हे पुस्तक केवळ आत्मचरित्र नसून – एक काळ, एक दृष्टिकोन आणि अनुभवांची समृद्ध शिदोरी आहे – जी आजच्या पिढीला नव्या वाटा दाखवणारी ठरू शकेल.





