गायरान जमीन मागणीसाठी गेलेल्या कार्यकर्त्याच्या गाडीला अपघात – एकाचा मृत्यू १५ जण जखमी..

करमाळा (दि. 12): देवळाली येथील पारधी समाजातील काही नागरीक मोहोळ येथील वनविभागाच्या कार्यालयात गायरान जमीन मागणीच्या कामासाठी एका टेम्पोमध्ये जात होते. टेम्पो हिवरे फाट्याजवळ वनविभागाच्या कार्यालयाकडे वळून जाताना सोलापूरहून पुणे येथे निघालेल्या एका मालट्रकने टेम्पोला मागून जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात एकजण जागीच ठार तर अन्य १५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात १२ जूनला दुपारी तीन वाजता सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हिवरे फाट्याजवळ घडला आहे. यात किरण विक्रम काळे (रा. नेरले) यांनी पोलीसात फिर्याद दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे, की देवळाली येथील पारधी समाजाचे काही नागरीक मोहोळ तालुक्यातील वनविभागाची गायरान जमीन मागणीच्या कामासाठी एमएच १३ डीक्यू ०८९९ या क्रमांकाच्या टेम्पोमधून निघाले होते.

हिवरे फाट्याजवळ टेम्पोला मोहोळकडून भरधाव वेगात आलेल्या मालट्रक क्र. डीएन ०९ एस ९९६९ ने जोराची धडक दिली. या अपघातात विक्रम हुरमुशा काळे (वय – ४९) हा जागीच ठार झाला आहे. तर तोगराबाई धोंडिराम काळे (वय ४५, रा. हिवरे), अर्चना आजिनाथ काळे ( वय – ४०, रा. नेरले), आजिनाथ रमेश काळे (वय ४५), सुरेश अशोक काळे (वय-३५ रा.मांगी), जेयब्या हुनाजी पवार (वय – ५५ रा. वीट), संतोष घनशाम मुरकुटे (वय-४२, रा. मांगी), ललित पवार (वय २७, रा. हिवरे ना.), बाबुशा मारुती पवार (वय ६०, रा. वीट), नेताजी चंदू शिंदे (वय४०, रा. बिसमिलानगर, मुळेगाव रोड), हमखास हुनाजी पवार (वय – ५५, रा.वीट), मिराबाई मस्के (वय ६०, रा. अकोलेकाटी), अशोक खंडू काळे ( वय – ६०, रा. मांगी), आस्मनतारा हुरमुशा काळे (वय – ४७) हे १५ जण जखमी झाले आहेत. ट्रक चालक गुजेश्वरसिंह कौशलसिंग झाकलवार (मध्यप्रदेश) यांचेवर गुन्हा दाखल झाला आहे.




