मुलगी पहावयास गेले अन् 300 रुपयात लग्न करून आले
करमाळा / संदेश विशेष प्रतिनिधी :
करमाळा (ता.5) : आजकालच्या विवाहात आपण पाहतो की, लाखो रुपये खर्च करून बँड-बाजा वाजवत वरात काढणे, कपडे, डाग दागिने, बस्ता, भांडी अशा विविध वस्तूंवर खर्च केला जातो आणि लाखो रुपये विवाहात उडवले जातात, परंतु या सर्व गोष्टींना फाटा देत पोथरे (ता.करमाळा) येथील नवरदेवाने समजासमोर एक आदर्श घडवून आणला आहे, नवरदेव मुलगा नवरी मुलगी पहावयास गेला आणि अनाआश्यक खर्चाला फाटा देत अवघ्या ३०० रुपयात विवाहसोहळा संपन्न केला आहे.
यात हकीकत अशी की, पोथरे (ता.करमाळा) येथील सुलतान दगडूभाई शेख यांचे चिरंजीव “आसिफ” शेख हे पाहूणे होवून ऊंडा पिंपळगाव (ता.जामखेड) येथील गुलजार शेख यांची कन्या “फरहीन” शेख हिला पहावयास गेले, दोन्ही कुटुंबातील सदस्यांना सर्व गोष्टी मान्य झाल्या त्यानंतर अवघ्या आर्ध्या तासात नवरदेवाचे चुलत बंधु पै.आयुब शेख, डाॅ.आलताब शेख, आजीम शेख, समीर शेख, नबिलाल शेख, सुलतान शेख यांनी दोन्ही कुटुंबातील व्यक्तींना समजुती घालुन लग्नातील अनावश्यक खर्च कसा टाळता येईल हे महत्त्व पटवून दिले.
त्यानंतर थोड्याच वेळात दोन्ही कुटुंबातील सदस्यांकडून व नवरा- नवरीकडून होकार येताच धर्मगुरुंना बोलावून अवघ्या ३०० रुपयात विवाहसोहळा पार पाडला. अचानक विवाहसोहळा पार पडला व कमी खर्चात विवाह संपन्न झाल्याने दोन्ही कुटूंबातील लोकांना समाधान व आनंद वाटत होता.
समाजात विवाहसोहळ्यात भरपुर प्रमाणावर खर्च करून मूलींच्या घरच्यांचा कर्जाचा डोंगर करुन ठेवणे, लग्नात हेच पाहिजे, तेच पाहिजे अशा गोष्टीमुळे घरे बरबाद होतात, त्यामुळे शेख कुटुंबियांनी चांगला निर्णय घेवून समाजासमोर एक आदर्श उपक्रम घडवून आणला आहे. अनेकांनी या विवाहसोहळयाचे कौतुक केले आहे, सध्या पोथरे परिसरात या विवाहाची जोरदार चर्चा आहे.