जागतिक विज्ञान परिषदेसाठी यशकल्याणीचे प्रा.गणेश करे-पाटील व स्त्री रोगतज्ज्ञ डॉ.निलेश मोटे यांना निमंत्रण..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : इंडोनेशिया या देशामधील रेकटोरॅट उद्याना विद्यापीठ,बाली व मायक्रोबायाॅलाॅजीस्ट सोसायटी ऑफ इंडीया यांच्या वतीने २९ ते ३१ ऑक्टोंबर या दरम्यान होणाऱ्या बायोटेकनाॅलाॅजीतील अद्ययावत संशोधनशास्त्र व आधुनिक सुक्ष्मजीव तंत्रज्ञान या विषयावर जागतिक विज्ञान परिषद होणार आहे. या विज्ञान परिषदेमधे यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील व प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ.निलेश मोटे यांना ग्रामीण भागातील सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल या कार्याची दखल घेत एक अभ्यासक म्हणून विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.
या परिषदेत जगातील विविध देशातील संशोधक,औषध निर्माण शास्त्रातील प्राध्यापक, संशोधक,बहुराष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळेचे संचालक,मानसशास्त्रज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रातील डाॅक्टर्स यांचा सहभाग असणार आहे. प्रा.गणेश करे-पाटील हे गेल्या दहा वर्षांपासून ग्रामीण भागात कार्यरत असून प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्यामधे विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात.
डाॅ.निलेश मोटे यांनी आतापर्यंत हजारो प्रसुती शस्त्रक्रिया या मोफत केल्या आहेत.
गरोदर महिला अनेकदा वेळेआधी किंवा वेळेनंतर प्रसूत होतात. त्यामुळे स्त्री व नवजात अर्भक यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. हे अकाली बाळंतपण टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येईल तसेच क्लिनीकल स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर यावर
डाॅ.निलेश मोटे हे आपला प्रबंध सादर करणार आहेत. प्रा.गणेश करे-पाटील व डाॅ.निलेश मोटे यांना या परिषदेसाठी निमंत्रित केल्यामुळे करमाळ तालुक्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे.