करमाळा तालुक्यातील अजून 35 गावात ‘आनंदाचा शिधा’ कधी मिळणार ? : ॲड. राहुल सावंत
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यात काही गावात रेशन किटचे वाटप झाले असले तरी तालुक्यातील अजून 35 गावात दिवाळी निम्मी संपली तरीही पामतेल, साखर, रवा, चणाडाळ या कीटचे वाटप झालेले नाही, तरी येथील रेशन कार्डधारकांना लवकरात लवकर या किटचा लाभ मिळावा अशी मागणी तालुका हमाल पंचायतचे अध्यक्ष व पंचायत समिती माजी सदस्य ॲड.राहुल सावंत यांनी केली.
याबाबत पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, गोरगरीब कुटुंबाची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने केवळ शंभर रुपये मध्ये एक लिटर पामतेल आणि प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ या चार वस्तूंचे किट देण्याचा निर्णय घेतला आहे ; परंतु दिवाळी निम्मी संपली तरी अद्याप करमाळा तालुक्यातील शासकीय गोदामातून अजून 35 गावात रेशन दुकानाकडे या किटचे वाटप सुरू झालेले नाही.
सध्या चार वस्तू पैकी रवा, साखर, पामतेल गोदामापर्यंत आले आहे. परंतु ठेकेदार यांनी चणाडाळ अद्याप पोहोच केलेली नाही, त्यामुळे चारही घटक उपलब्ध झाल्यानंतरच त्याचे कीट रेशन कार्डधारकांना मिळण्याची शक्यता आहे.. रेशन कार्ड धारक नागरीकांना शासनाचा हा स्वस्तातील शिधा मिळणार कधी याकडे त्यांचे लक्ष लागलेले आहे.
सध्या अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी , शेतमजूर, कामगार, वंचित या सर्व घटकांना ओला दुष्काळाचा फटका बसला आहे. तसेच दिवसेंदिवस महागाई वाढत चालली असून याचादेखील फटका या सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. अन्नधान्याचे दर वाढत असल्याने महिन्याचा घर खर्च भागवणे नागरिकांना अवघड झाले आहे.
गेले दोन वर्ष कोरोनामुळे अनेकांचे बिघडलेली आर्थिक घडी हळूहळू बसत असली तरी गोरगरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सरकारने दिवाळी सणानिमित्त केवळ शंभर रुपयांमध्ये प्रत्येकी एक एक किलो रवा, चणाडाळ, साखर, एक लिटर पामतेल याचे किट रेशनिंग दुकानातून देण्याचा निर्णय घेतला. याबाबत शासनाने परिपत्रकही काढले असून त्यामध्ये या वस्तूंना आनंदाचा शिधा असे बोलले जात आहे अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब तसेच आयपीएल केसरी रेशन कार्ड धारक नागरिक यांना नेहमीच अन्नधान्य व्यतिरिक्त हा शिधा शंभर रुपयांमध्ये मिळणार आहे.
तसेच निकृष्ट दर्जाचा शिधा न स्वीकारण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शिवाय एका रेशन कार्ड धारकाला एकच कीट देण्यात येणार असून सुट्ट्या पद्धतीने शिधा विक्री होणार नाही तशी सूचना शासनाने परिपत्रकातून केली आहे. दिवाळीच्या काही दिवस अगोदर पासूनच घरामध्ये फराळ बनवण्याची सुरुवात होत असते परंतु यावेळी अजून 35 गावात गरिबांना निम्मी दिवाळी संपली तरी याचा लाभ घेता आला नाही,
मात्र अद्याप अजून 35 गावातील नागरिकांना पामतेल, चणाडाळ, साखर, रवा या चार वस्तूंच्या किटचे रेशन कार्डधारकांना वाटप सुरू झालेले नाही. त्यामुळे हे रेशनकार्ड धारक शिधा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत तरी लवकरात लवकर या किटचे वाटप व्हावे व पात्र रेशनकार्ड धारक यांना या आनंदाचा शिधा चा लाभ मिळावा. यासाठी हे निवेदन ॲड.राहुल सावंत यांनी ई-मेल द्वारे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी सोलापूर, तहसीलदार करमाळा यांना देण्यात आले आहेत.