यशवंतराव चव्हाण महाविद्यालय 12 वी परिक्षेसाठी सज्ज – महाविद्यालयाच्या परिसरामध्ये 100 मीटर पर्यंत 144 कलम लागु…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे आयोजित उच्च माध्यमिक इयत्ता बारावी कला,वाणिज्य व विज्ञान वर्गाची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, परीक्षा केंद्र
(421) वर 1296 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. त्या विद्यार्थ्यांसाठीची बैठक व्यवस्था करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात करण्यात आली असून त्याबाबत सुचना फलकावर विद्यार्थ्यांसाठी लावण्यात आलेली आहे.
विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील यांच्या सूचनेनुसार या सर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
या महाविद्यालयात सर्व भौतिक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. प्रथमोपचार कक्ष,शुद्ध पिण्याचे पाणी , वर्गामध्ये लाईट व फॅन अशी प्रशस्त व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच अपंग विद्यार्थ्यांसाठी वेगळी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक दिवशी बैठक व्यवस्था बदलत असल्याने त्या बैठक व्यवस्थेची माहिती सर्व विद्यार्थ्यांना व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आहे.
२१ फेब्रुवारीला इंग्रजी विषयाच्या पेपर दिवशी येणाऱ्या परीक्षार्थींचे उत्साहाच्या वातावरणामध्ये स्वागत करण्यात येणार आहे. तणाव विरहित मोकळ्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, असे आवाहन केले आहे. केंद्र क्रमांक ( 421) 12 वी परीक्षेसाठी सज्ज झालेले आहे. असे केंद्र संचालक उपप्राचार्य संभाजीराव किर्दाक यांनी सांगितलेले आहे. या परीक्षेच्या कालावधीमध्ये महाविद्यालयाच्या परिसरामध्ये 100 मीटर पर्यंत 144 कलम लागू असल्यामुळे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.