बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून होणार सुरु - Saptahik Sandesh

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून होणार सुरु

करमाळा (तुषार तळेकर) – इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी महसूल विभागाची २८ तर जिल्हा परिषदेची १८ भरारी पथके नेमण्यात आली आहेत.

कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याला एक ते तीन वर्षे पुन्हा परीक्षेला बसता येत नाही. त्यामुळे कोणीही कॉपी न करता प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, असे आवाहन पुणे बोर्डाने केले आहे. जिल्ह्यातील सहा प्रांताधिकारी, ११ तहसीलदार, नायब तहसीलदार, पंचायत समित्यांचे ११ गटविकास अधिकारी, माध्यमिक, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी, योजना विभागाचे शिक्षणाधिकारी, जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य, महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी यांच्यासह दोन उपशिक्षणाधिकाऱ्यांची विशेष पथके देखील जिल्ह्यातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी बैठे पथक म्हणून नेमले जातील. तर उर्वरित परीक्षा केंद्रावर अंगणवाडी पर्यवेक्षक, महसूल व जिल्हा परिषदेचे कर्मचारी, जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. बैठे पथकात एकूण तीन सदस्य असतील, त्यात एक महिला असणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांनी केंद्रावर हजर राहायचे असून पेपर सुरू झाल्यावर कोणालाही परीक्षेला बसू दिले जाणार नाही.

पाणी वाटप करणारे कर्मचारी यंदा नसणार
परीक्षा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पाणी वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक आता शाळांना करता येणार नाही. बोर्डाने त्यासंबंधीचे आदेश सर्वच केंद्रांना दिले आहेत. विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्याचे काम त्यांच्याच माध्यमातून होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षीपासून परीक्षा हॉलवरील पर्यवेक्षकच स्वतःकडे पाण्याची बाटली ठेवून विद्यार्थ्यांना पाणी देतील, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडताना पायात चप्पल, शुज बाहेर काढूनच आत प्रवेश द्यावा, अशाही बोर्डाच्या सूचना आहेत.

  • इयत्ता बारावीचे विद्यार्थी ५२,८७०
  • परीक्षा केंद्रे ११८
  • इयत्ता दहावीचे विद्यार्थी ६५,७४९
  • परीक्षा केंद्रे १८२
  • भरारी पथके ४६
  • बैठे पथके ३००

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!