५ फेब्रुवारी हा ‘आंतरराष्ट्रीय जात-मुक्त दिवस’ म्हणून घोषित करावा – संयुक्त राष्ट्र संघटनेकडे झिंजाडे यांची मागणी

करमाळा: अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा गावाने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वत:ला जात-मुक्त गाव म्हणून घोषित केले आहे. या ठरावात गावकऱ्यांनी “आमची जात – मानव ” असे मुख्य उद्दिष्ट ठेऊन जातीय भेदभाव, अस्पृश्यता आणि सामाजिक अन्यायाचा नकार केला आहे.
याच पार्श्वभूमीवर करमाळा(जि. सोलापूर) येथील महात्मा फुले समाज सेवा मंडळ,या संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ५ फेब्रुवारी हा दिवस International Caste-Free Day (आंतरराष्ट्रीय जात-मुक्त दिवस) म्हणून घोषित करण्याची औपचारिक विनंती संयुक्त राष्ट्र संघटनेकडे (United Nations) पत्राद्वारे केली आहे.

याविषयी प्रतिक्रिया देताना श्री. झिंजाडे म्हणाले की, जातीय तेढ, धार्मिक विद्वेष, सामाजिक असहिष्णुता निर्माण करून त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याच्या आजकालच्या अत्यंत निंद्य व असंवेदनशील वातावरणात महाराष्ट्रातील अहिल्या नगरच्या नेवासा तालुक्यामधील सौंदाळा गावाने ‘जात’ त्यागून समाज परिवर्तनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. हे पुरोगामी पाऊल अनुकरणीय असेच आहे. हा ठराव भारतीय संविधानातील कलम 14, 15 आणि 17 नुसार समानता, भेदभावविरोध आणि सामाजिक न्याय या मूल्यांना बळकटी देणे हा आहे. ५ फेब्रुवारीला जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्यास सामाजिक समता, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठेचा राष्ट्रीय तसेच जागतिक संदेश देणारा हा दिवस ठरेल, असा विश्वास झिंजाडे यांनी व्यक्त केला.
संयुक्त राष्ट्र संघाबरोबरच या मागणीचे निवेदन भारतातील National Human Rights Commission (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग) तसेच Ministry of Social Justice and Empowerment (सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय) यांनाही सादर करण्यात आले आहे.

सौंदाळा गावाने मांडलेल्या ठरावाची संकल्पना व प्रेरणा ही प्रमोद झिंजाडे यांच्या मार्गदर्शनातून गावाला प्राप्त झाली. सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे यांनी ग्रामसभेत जात मुक्तीचा ठराव मांडला व तो सर्व ग्रामस्थांनी मान्य करून मंजूर केला. त्यानुसार खालील मुद्दे ठरावात समाविष्ट करून मंजूर करण्यात आले.
- सौंदाळा गावामध्ये आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यात येईल.
- जात, पंथ, धर्म किंवा वंशाच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही.
- गावातील सर्व नागरिक समान असून ‘माझी जात मानव’ ही भावना सर्वांनी स्वीकारावी.
- सार्वजनिक ठिकाणे, शासकीय योजना, ग्रामपंचायत सेवा, सामाजिक-धार्मिक कार्यक्रम, विवाह तसेच सण-उत्सवांमध्ये कोणत्याही प्रकारचा जातिभेद पूर्णपणे बंद राहील.
- गावामध्ये जातनिहाय प्रथा, भेदभाव, बहिष्कार, अस्पृश्यता किंवा कोणताही सामाजिक अन्याय आढळल्यास ग्रामसभा / ग्रामपंचायत तात्काळ कारवाई करील.
- पाणीपुरवठा, मंदिरे, स्मशानभूमी, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय आदी सर्व सार्वजनिक ठिकाणे सर्व नागरिकांसाठी समान हक्काने खुली राहतील.
- कोणताही नागरिक सोशल मीडियावर जातीय द्वेष, भेदभाव करणारे किंवा समाजात तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित करणार नाही.
- शासनाच्या समता व सामाजिक न्यायाशी संबंधित सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील.


