आदिनाथ पूर्ण ताकदीने लढण्याचा पाटील गटाचा निर्धार - Saptahik Sandesh

आदिनाथ पूर्ण ताकदीने लढण्याचा पाटील गटाचा निर्धार

करमाळा(दि.११) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असुन विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले की श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा पाटील कुटुंबातील एक घटक असल्याप्रमाणे आहे. कर्मयोगी गोविंद बापु पाटील यांच्या अथक प्रयत्नानंतर या कारखान्याची उभारणी झाली. यंदाच्या निवडणुकीत आमदार नारायण आबा पाटील यांनी लक्ष द्यावे आणि आदिनाथ कारखान्यास गतवैभव प्राप्त करुन देण्याकरिता हि निवडणूक लढवावी असा सुर सभासदांमधून उमटत आहे. पाटील गटाकडूनही आता जोरदार तयारी सुरू झाली असुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवार चाचपणी सुरु केली गेली आहे. आमदार नारायण आबा पाटील यांनी आमदार पदाची सुत्र हाती घेतल्यानंतर शंभर दिवसाच्या आत कुकडीची दोन व दहिगाव उपसा सिंचन योजनेचे एक आवर्तन शेतकऱ्यांना मिळवून दिले तसेच चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुध्दा मतदार संघातील महत्वाचे प्रश्न मांडून‌ त्याची सोडवणुक करण्यासाठी मंत्र्यांच्या गाठीभेटीचे सत्र सुरू ठेवले असल्याने नागरिकांतुन आमदार नारायण आबा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त केले जात आहे. आता आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीतही सभासद शेतकरी सत्ता बदल‌ करण्याच्या मानसिकतेत आहेत. यामुळे आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत पाटील गट पुर्ण ताकदीने उतरणार असुन या निवडणुकीत कोणते निर्णय घ्यायचे याचे संपुर्ण अधिकार आमदार नारायण आबा पाटील यांना आहेत. यामुळे आमदार महोदय घेतील तो निर्णय अंतिम असणार आहे. उद्यापासून पाटील गटातील कार्यकर्ते सुचना दिल्यानुसार आपआपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात करतील.

यासाठी राजन (अण्णा) पाटील,बाजार समिती माजी संचालक देवानंद बागल, विद्यमान संचालक नवनाथ बापु झोळ तसेच पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा अर्जुनराव सरक यांचेकडून नियोजन व‌ रणनिती आखली जात असून इच्छुकांनी आमदार पाटील कार्यालयातून माहिती घेऊन आपले उमेदवारी अर्ज भरावेत असे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती प्रवक्ते सूनील तळेकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!