अखेर कमलेश गेला ..

रविवारचा दिवस असल्याने नेहमीप्रमाणे झोपेतून उठायला थोडा उशीर झाला. सवयीप्रमाणे सर्वात आधी मोबाईल पाहिला व ग्रुपवर आलेले मेसेज पाहिले. त्यातील आमच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या ग्रुपवर मेसेज पाहिला. अनेक शिक्षक बंधू-भगिनींचा भावपूर्ण श्रद्धांजली हा समान संदेश थोडा बारकाईने पाहिला आणि अत्यंत वाईट बातमी समोर आली. ती म्हणजे, माझा विद्यार्थी कमलेश नवनाथ क्षीरसागर हा देवा घरी गेला. या अत्यंत दुःखद बातमीने मन व्यथित झालं.
कमलेशने आमच्या शाळेत इ. पाचवीमध्ये सन – 2022 प्रवेश घेतला. मी त्याचा वर्गशिक्षक! कमलेश अत्यंत हुशार आणि शिस्तप्रिय होता. वर्गातील इतर मुलंदेखील सर्व त्यांचे मित्र होते.. कधी त्याची तक्रार नाही. अभ्यासात, खेळात तो सहभाग घेत असे. तो खोखो खेळ खूप छान खेळत असे.. धावण्याच्या शर्यतीत खूप वेगाने धावायचा.. सर्वांचा आज्ञाधारक, शिस्तप्रिय आणि हुशार..! कमलेश तसा सर्व शिक्षकांचा लाडका विद्यार्थी. कमलेश जेंव्हा सातवीला गेला तेंव्हा, सहामाही परिक्षेला तो शाळेत आला नाही. वर्गशिक्षक या नात्याने पालकांना फोन केला समजलं कमलेश आजारी आहे. वाटलं दोन-चार दिवसानंतर कमलेश परत शाळेत येईल. परंतु, नंतर समजलं की त्याला खूप मोठ्या आजाराने कवटाळलं आहे.. रक्ताचा कर्करोग आजार त्याला झाला ते समजलं तेव्हा खूपच वाईट वाटले. परंतु, वाटलं की यातून बाहेर येईल.पण, नियतीला हे मान्य नव्हतं.
त्याचे वडील भेटल्यावर नेहमी सांगायचे. मी त्यांना अधूनमधून फोन करून चौकशी करायचो की, “कमलेशची तब्येत कशी आहे?” वडील सांगायचे की, “तो आता बरा आहे आणि लवकरच शाळेत सुद्धा येईल “काही दिवस उपचारानंतर कमलेश शाळेतसुद्धा येऊ लावला. आपल्याला काही आजारच झाला नाही अशाप्रकारे तो वर्गात बसू लागला दररोज अभ्यास करत होता. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. आई-वडिलांनी आपल्याला लाडक्या मुलाला वाचवण्यासाठी जिवाचे रान केले.. शर्थीचे प्रयत्न केले. मुंबई पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडे त्याच्यावर उपचार केले.. परंतु त्यांना त्याला वाचवण्यात अपयश आले आणि अखेर कमलेशचे 9 मार्च 2025 रोजी निधन झाले.
खरं तर, अशी दुर्दैवी घटना लिहिण्याची वेळ कोणत्या शिक्षकावर येऊ नये अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना..! परंतु मला पालकांना एकच विनंती या निमित्ताने करायची आहे की , कोणतेही व्यसन नसताना शारीरिकदृष्ट्या सुदृढ असताना खेळामध्ये पारंगत असताना कमलेशला या जीवघेण्या आजाराने ग्रासले.. परत अशा कमलेशसारखा विद्यार्थी परत आपल्यातून निघून गेला नाही पाहिजे. आपण आपल्या मुलाची योग्य काळजी घेतली पाहिजे. त्याला संतुलित व सकस आहार दिला पाहिजे. त्याच्या आरोग्याची नियमित तपासणी केली पाहिजे. पालकांनी आपल्या मुलाच्या होत असलेल्या वर्तनातील बदलात लक्ष दिले पाहिजे. बाहेरील खाद्य पदार्थ टाळले पाहिजे . मुलांना स्वच्छ पाणी दिले पाहिजे, आजारपणात पण डॉक्टरांशी संवाद साधला पाहिजे.एखादा आजार आपल्या पाल्याला सारखा होत असेल तर, त्यामागची कारणे, तपासण्या , तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन हे घेतलेच पाहिजे.
● राजू वाघमारे, सहशिक्षक, महात्मा गांधी विद्यालय करमाळा
याच संदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी लिहिलेला लेख : वाढदिवसाचा केक कापला आणि दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी अंत झाला






