करमाळ्यात सव्वादोन लाखांचा गांजा जप्त, आरोपीला अटक – करमाळा पोलिसांची कारवाई

करमाळा, प्रतिनिधी : करमाळा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील मोहिमेत मोठी कारवाई करत सुमारे २ लाख ५६ हजार २०० रुपये किमतीचा गांजा आणि ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ३ लाख ६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जून रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कमलाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या चौकामध्ये एक व्यक्ती मोटारसायकलवरून गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सायकर प्लॉटिंग परिसरात सापळा रचला.
दरम्यान, एका मोटारसायकलवरून येणाऱ्या संशयित व्यक्तीला पोलिसांनी थांबवून चौकशी केली. त्याची ओळख गौरव उर्फ फंट्या दिलीप दोषी (रा. गुजर गल्ली, करमाळा) अशी पटली. पंचांसमक्ष त्याची व वाहनाची झडती घेतली असता स्कुटीच्या मध्यभागी ठेवलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीत गांजा आढळून आला.
पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाचे वजन १० किलो २४८ ग्रॅम असून त्याची किंमत २ लाख ५६ हजार २०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच आरोपीकडील हिरो मॅस्ट्रो स्कुटी (किंमत ५० हजार रुपये) देखील जप्त करण्यात आली. अशाप्रकारे एकूण ३ लाख ६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४०/२०२६ दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम २०(ब)(II)(ब) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कवाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक रणजित माने, पोउनि संदीप बनकर, पोहेकॉ अर्जुन गोसावी, अजित उबाळे, अमोल रंदील, चेतन पवार, रविराज गटकुळ व बापूसाहेब कोकाटे यांनी सहभाग घेतला.

