मुख्यमंत्री सहायता निधी मिळविण्याची प्रक्रिया आता ऑनलाईन
केम (प्रतिनिधी संजय जाधव) – मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना आता मंत्रालयात जाण्याची गरज नसून, पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया करुन वैद्यकीय मदत मिळविता येते असल्याची माहिती वैद्यकीय सहाय्यक गणेश चव्हाण यांनी दिली.
मुख्यमंत्री सहायता कक्षाला आधुनिक रुप आले असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा चालू करण्यात आली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना आता मंत्रालयात जाण्याची आवशकता नाही, घरून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा करण्यात आली आहे. यात एक दूरध्वनी क्रमांक, व्ह्ट्सऍप क्रमांक आणि अँड्रॉईड ऍप देखील सुरू करण्यात आले आहे. प्ले स्टोरवर जाऊन तुम्ही CMRF सर्च करून ऍप डाउनलोड करुन घ्या. आणि त्यातून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. तसेच तुम्ही केलेल्या अर्जाची स्थिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर ८६५०५६७५६७ या व्हॉट्सअप क्रमांकावर HI असा मेसेज करा, आणि तुमचा मीटिंग आयडी आणि अर्जदाराचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती तुमच्या व्हॉट्सवर कळेल.
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी लागणारे कागदपत्रे – विहित नमुन्यातील अर्ज, रुग्णाचे आधारकार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रुग्णालयाचे कोटेशन (रुग्णालय खासगी असेल तर वैद्यकीय अधिकारी किंवा जिल्हा शल्यचिकिस्तक यांच्या कडून अंगीकृत करून घ्यावे.) अपघात असल्यास एफआयआर, आमदार किंवा खासदारांचे शिफारस पत्र, सिटीस्कॅन एमआरआय रिपोर्ट
अर्ज करण्याची प्रक्रिया – वरील कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करुन घ्या, आणि मोबाईल मधील Gmail हे ऍप ओपन करा आणि aao.cmrf-mh@mah.gov.in या मेल आयडी वर डॉक्युमेंट पीडीएफ स्वरूपात पाठवा. आणि कागदपत्रांची हार्ड कॉपी ही मादाम कामा रोड, मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय सातवा मजला, नवी मुंबई या पत्त्यावर स्पीड पोस्ट द्वारे पाठवा.
२०१४ साली करमाळ्याचे सुपुत्र मंगेश चिवटे यांनी या कक्षाची संकल्पना मांडली होती, मांडलेली संकल्पना कायद्याच्या चौकटीत बसवून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यात उतरवली. त्यानंतर महा विकास आघाडीच्या काळात या कक्षाच्या माध्यमातून फक्त अडीच कोटी रुपये मदत गरजूंना करण्यात आली आणि हा कक्ष बंद पडला. आणि आता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच हा कक्ष सुरू केला, आणि एका वर्षात ११३ हून अधिक कोटी रूपयांचा निधी यातून गरजूंना मिळाला. कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी यात अनेक बदल करुन कक्ष वाढीसाठी अनेक प्रयत्न केले.