मराठा समाजातील विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या मागणीला अखेर यश – प्रा.रामदास झोळ
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना ज्याप्रकारे शैक्षणिक फी, वसतिगृहभत्ता, शिष्यवृत्ती, अभ्यासक्रमांच्या संख्येमध्ये वाढ आदी ज्या शैक्षणिक सुविधा मिळतात तशाच शैक्षणिक सुविधा महाराष्ट्रातील मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी आरक्षणाबरोबर मिळाव्यात यासाठी मी गेल्या सहा वर्षापासून शासन स्तरावर प्रयत्न करत आलो आहे आणि नुकतेच या गोष्टीला यश आले असल्याचे माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक रामदास झोळ यांनी प्रसार माध्यमांना दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, ४ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्यातील सचिव व जिल्हाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकित मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे समान शैक्षणिक सुविधा कशा देता येतील याविषयीचे माझे मुद्दे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्याता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून सदर बैठकीत मांडले.
सदर बैठकीनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची बैठक होऊन शैक्षणिक सुविधेतील समानता राबवण्याचे धोरण ठरले त्यामध्ये बार्टी, सारथी व महाज्योत मधील सर्व योजना /सवलती एकसारख्या करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. तसेच उच्च उत्पन्न गटातील पालकांना नॉन क्रिमिलियर ची मर्यादा लावून गरिबांना शैक्षणिक सवलतीचा फायदा व्हावा म्हणून विविध निर्णय घेण्यात आले. त्यामुळे आपण पाठपुरावा करत असलेल्या मागणीला यश आल्याचे श्री.झोळ यांनी प्रतिपादन केले. तसेच यासंदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार शरद पवार व मराठा आरक्षण आंदोलनाकर्ते मनोज जरांगे-पाटील यांना प्रत्यक्ष भेटून या गोष्टींबाबत चर्चा केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
Related News – आरक्षणाबरोबर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती लागू कराव्यात – प्रा. रामदास झोळ