आपल्या कार्यकाळात निधी मंजूर केलेल्या विविध कामांची संजयमामा शिंदेंनी केली पाहणी

करमाळा(दि.७): विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी मतदारसंघातील गावांना भेट देत आपल्या कार्यकाळात निधी मंजूर केलेल्या विविध कामांची पाहणी केली.

यावेळी राजुरी वीज उपकेंद्राला श्री.शिंदे यांनी भेट दिली. राजुरी वीज उपकेंद्राला शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात मंजुरी मिळवली व त्याचे काम आज युद्ध पातळीवर सुरू आहे. यामुळे राजुरीतील विजेची अत्यंत महत्त्वाची अडचण दूर होणार आहे.येत्या दोन महिन्यात हे वीज उपकेंद्र राजुरीकरांच्या सेवेत खुले होणार आहे.
याचबरोबर सावडी ते वेणेगाव फाटा या हॅम रस्त्याच्या कामाची ही माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी पाहणी केली. 71 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी तब्बल 271 कोटी रुपयांचा निधी असून हा रस्ता दुपदरी सिमेंट काँक्रिटीकरण आहे. या रस्त्यामुळे सावडी, राजुरी,पोधवडी, अंजनडो,झरे,कुंभेज, कोंडेज,निंभोरे, मलवडी, व केम ही करमाळा तालुक्यातील 11 गावे तर उपळवटे, दहिवली, कनेरगाव व वेणेगाव ही माढा तालुक्यातील चार गावे अशी एकूण 15 गावे सोलापूर व पुणे या राष्ट्रीय महामार्गाला व नगर जिल्ह्याला जोडली जाणार आहेत.
यावेळी तानाजी झोळ, नंदकुमार जगताप, महादेव आडसूळ,वैभव पाटील,संजय सारंगकर, सुनील पाटील, भाऊसाहेब जाधव, सुहास गरुड, उदय साखरे, आर. आर बापू साखरे, दादा बापू साखरे उपस्थित होते.





