सिटी सर्व्हे ऑफिसमध्ये सुधारणा झाली नाही तर टाळे ठोकणार – सुजय जगताप
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – येत्या आठ दिवसात जर सिटी सर्व्हे ऑफिसमध्ये सुधारणा झाली नाही तर टाळे ठोकणार असल्याचे मत युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुजय जगताप यांनी व्यक्त केले. आज (दि.२४) काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
याविषयी अधिक माहिती देताना सुजय जगताप म्हणाले की, तालुक्यातून सर्वसामान्य लोक कामासाठी सिटीसर्व्हे ऑफिसला आल्यानंतर त्यांना गैर वागणूक दिली जाते. एका कामासाठी 15-15 हेलपाटे मारले तरी काम होत नाही. अधिकारी कर्मचारी सतत गैरहजर असतात. त्या ऑफिसला कोणी वालीच राहिला नाही. अशी परिस्थिती गत दोन वर्षापासून आहे. काही काही व्यक्ती दोन दोन वर्ष हेलपाटे मारून आणखी त्यांची कामे मार्गी लागली नाहीत. येत्या आठवड्यात जर यात सुधारणा झाली नाही तर आम्ही पक्षाचे सर्व कार्यकर्ते ऑफिसला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी काँग्रेसचे किसान सेल चे तालुकाध्यक्ष दादासाहेब कुदळे, कुगांवचे सरपंच सागर पोरे,सचिव जैनूदिन शेख, ओबीसि सेल चे जिल्हा उपाध्यक्ष दस्तगीर पठाण,अशोक शिंदे,राजेंद्र कुंभार, छगन मोहोळकर, गणेश फलफले, नितीन चोपडे, प्रतीक जगताप, बबलू चिंचकर, योगेश राखुंडे, किरण साळुंखे, बालाजी स्वामी, विकी महानवर उपस्थित होते. सदर निवेदनाची प्रत मा. पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आली.