आरोग्यविषयक समस्यांबाबत प्रहार संघटनेने दिले जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारीचे निवेदन
केम ( प्रतिनिधी/संजय जाधव) :
शासनामार्फत आरोग्य विषयी महात्मा फुले जन आरोग्य योजना, वाजपेयी आरोग्यश्री योजना, आयुष्यमान भारत योजना अशा अनेक योजना आहेत. परंतु सोलापूर जिल्ह्यात व शहरामध्ये असलेल्या अनेक धर्मादाय हॉस्पिटल मध्ये या योजनांचा गोरगरीब नागरिकांना उपचारासाठी फायदा होत नाही. कोणत्याही सवलती मिळत नाही, अशी तक्रार प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली.
प्रहार संघटनेचे शिष्टमंडळाने नुकतीच सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली.यावेळी आरोग्य सुविधेविषयी तक्रारी मांडल्या. ग्रामीण भागात रात्री अपरात्री एखादा रुग्ण गंभीर आजारी असल्यास त्यावर उपचार होत नाही. डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण होते. १५ दिवसांपूर्वी केम येथे रात्री वेळेत उपचार न मिळाल्याने प्रभा पोळके या महिलेचा मृत्यू झाला. या विषया संदर्भात शिष्टमंडळाने लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली.
याची दखल घेत जिल्हाधीकाऱ्यांनी येत्या आठ दिवसांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, शासकीय डाॅक्टर यांची मिटिंग बोलावून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.
या वेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील, शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी, संपर्क प्रमुख जामीर भाई शेख करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर समर्थ गुंड, दिलीप ननवरे यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते