करमाळा मतदारसंघात एकूण ६९.७२% टक्के झाले मतदान - Saptahik Sandesh

करमाळा मतदारसंघात एकूण ६९.७२% टक्के झाले मतदान

करमाळा (दि.२१) –  काही अपवाद वगळता करमाळा मतदारसंघात विधानसभेचे मतदान सर्वत्र शांततेत व उत्स्फूर्तपणे पार पडले. या मतदारसंघातून एकूण ६९.७२% टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.  करमाळा विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वात जास्त मतदान भगतवाडी (८९.९९ %) येथे झाले आहे  तर सर्वात कमी मतदान  कुर्डुवाडी मध्ये (५४.०५%) झाले आहे. करमाळा शहरात ६२.४८% , जेऊर ६६.४३% तर केम येथे ६६.४५ % मतदान झाले आहे.(झालेल्या मतदानाची गाव निहाय आकडेवारी बातमीत खाली दिलेली आहे.)

देवळाली येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पुरुषांच्या व महिलांच्या वेगवेगळ्या रांगा लागल्या होत्या.

काल (दि.२०) मतदानादिवशी सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती. पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. वाड्या वस्त्यावरून येणाऱ्या मतदारांसाठी उमेदवारांनी चार चाकी गाडीची सोय केली होती. बाहेरगावी नोकरी व्यवसाय निमित्त गेलेल्या अनेक मतदारांनी देखील मतदानासाठी येऊन उत्स्फूर्तपणे मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड, सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे व त्यांचे सर्व सहकारी यांनी मतदान व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. अनेक मतदान केंद्रावर उमेदवारांनी भेटी दिल्या.

करमाळा विधानसभा मतदारसंघ हा एकूण करमाळा तालुक्यातील 118 गावे व माढा तालुक्यातील छत्तीस गावे यांचा मिळून बनलेला आहे. यामध्ये एकूण ३ लाख २८ हजार ९९४ इतके मतदार आहेत यापैकी २ लाख २९ हजार ३७५ मतदारांनी काल (दि.२०) वेगवेगळ्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलेले आहे. एकूण ६९.७२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे.

करमाळा मतदार संघामध्ये एकूण १७१५१५ इतके पुरुष मतदार आहेत तर १५७४६८ इतके महिला मतदार आहेत. यापैकी १२३५१७ पुरुष मतदारांनी मतदान केले म्हणजेच ७२.०१ टक्के पुरुषांनी मतदान केले. तर १०५८५३ महिला मतदारांनी मतदान केले जे की एकूण महिला मतदाराच्या ६७.२२ टक्के आहे.  करमाळा मतदारसंघात एकूण ११ तृतीयपंथी  मतदार आहेत तर ५ तृतीयपंथीनी मतदान केले.

यंदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची निवडणूक झालेली आहे. चारही स्पर्धेतील उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात गावोगावी प्रचार केलेला आहे. प्रत्येक उमेदवाराला आपणच जिंकून येईल असा आत्मविश्वास आहे. निवडणूक अत्यंत चुरशीची असल्याने यामधून कोण आमदार होणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. येत्या २३ तारखेला करमाळा मतदारसंघाचा आमदार कोण होणार हे स्पष्ट होईल.

गावनिहाय आकडेवारी खाली दिलेली आहे

करमाळा : महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांनी मतदान केल्यानंतर त्यांच्या मातोश्री माजी आमदार शामल ताई बागल यांचे सोबत काढलेला फोटो
निमगाव (टें) : अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांनी सहकुटुंब मतदान केले
जेऊर : महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांनी मतदानानंतर कार्यकर्त्यांसमवेत काढलेला फोटो
वाशिंबे : अपक्ष उमेदवार रामदास झोळ यांनी सहकुटुंब मतदान केले
केम येथील बूथला निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड व सहाय्यक निवडणूक अधिकारी शिल्पा ठोकडे यांनी भेट दिली
केम येथील मतदान केंद्रावर स्वागत करताना निवडणूक कर्मचारी
कुगाव येथील १०४ वर्षांच्या केरु(नाना) विठोबा कोकरे यांनी मतदान केले

करमाळा तालुक्यातील कुगाव येथील १०४ वर्षांच्या केरु(नाना) विठोबा कोकरे यांनी आपल्या नातू तथा पश्चिम महाराष्ट्राचे वेतन पडताळणी अधिकारी  दयानंद धुळाभाऊ कोकरे यांच्यासमवेत कुगाव ता करमाळा जि सोलापूर येथे २४४ करमाळा विधानसभा मतदारसंघात २०२४ च्या विधानसभेसाठी मतदान केले. लोकशाही बळकट करण्यासाठी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली लोकसभा १९५२ पासुन आज पर्यंतच्या सर्वच लोकसभेसाठी तर मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर १९६२ च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून मा श्री केरु (नाना) कोकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

हिवरवाडी : सध्या व्यवसायानिमित्ताने दुबई मध्ये स्थायिक झालेल्या हिवरवाडी येथील सुनील बिबे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!