मिरवणूकीचा अनावश्यक खर्च टाळून युवा एकलव्य प्रतिष्ठानकडून अन्नदानाचा उपक्रम
करमाळा – येथील युवा एकलव्य प्रतिष्ठानकडून गणेशोत्सव साजरा करताना अनावश्यक खर्चाला फाटा देण्यात आला. गणेशोत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देणाऱ्या या प्रतिष्ठानने विसर्जन मिरवणूकीतील खर्च वगळून अन्नदान करण्याला महत्व दिले.
प्रतिष्ठानकडून शिवाजीनगर, विद्यानगर येथील जवळपास चारशे ते पाचशे गणेश भक्तांसाठी व एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा येथे दीडशे विद्यार्थ्यांना अन्नदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शुक्रवारी विद्यार्थ्यांना भोजन देण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच आश्रमशाळेतील झाडांसाठी ठिबक सिंचन सुविधा पुरविण्यात आली. याशिवाय वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
युवा एकलव्य प्रतिष्ठान हे नेहमीच रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रम राबवित असतात. यावर्षी गणेशोत्सव साजरा करत असताना अनावश्यक खर्च टाळून अन्नदान उपक्रम राबविल्याबद्दल प्रतिष्ठानचे कौतुक होत आहे. आगामी काळातही सामाजिक उपक्रम राबवू, असे प्रतिष्ठानचे सर्व सदस्यांनी आश्वासन दिले.