दुष्काळाच्या सावटाने मंदावलेली करमाळ्यातील बाजारपेठ गणरायाच्या आगमनाने आली फुलून - Saptahik Sandesh

दुष्काळाच्या सावटाने मंदावलेली करमाळ्यातील बाजारपेठ गणरायाच्या आगमनाने आली फुलून

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. यामुळे बाजारपेठेत उलाढाली कमी असल्याने अर्थव्यवस्थेतील इतर घटकही आपोआप आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. करमाळा शहरातील बाजारपेठेला तेजी नाही. परंतु अशा पार्श्वभूमीवर आज (१९ सप्टेंबर) गणेश चतुर्थी दिवशी गणरायाची प्रतिष्ठापना असल्याने करमाळा शहरातील मेन रोड, दत्तपेठ व राशीन पेठेत नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. अनेक दिवसांनी बाजारपेठ फुलून आली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

सार्वजनिक मंडळ, बाल मंडळ व घरगुती गणेश प्रतिष्ठापना करण्यासाठी गणेश मूर्ती खरेदी करणे तसेच गौरी गणपतीच्या सजावटीच्या खरेदीसाठी सकाळ पासूनच बाजारपेठेत गर्दी सुरू झाली होती. घरगुती गणेश मूर्ती शक्यतो दुपारपर्यंत प्रतिष्ठापना केली जाते त्यामुळे दुपारपर्यंत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.

सार्वजनिक मंडळ व बाल मंडळ यांनी दुपारनंतर गणेश मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढून प्रतिष्ठापना केली. करमाळा शहरातील जय महाराष्ट्र मित्र मंडळ, सरकार मित्र मंडळ,मेनरोड व्यापारी गणेश मंडळ, लोकमान्य तरुण मंडळ, गजानन सोशल व स्पोर्ट्स क्लब मंडळ, गजराज मित्र मंडळ, शिवाजी तरुण मंडळ (सावंत गल्ली), किल्ला विभाग तरुण मंडळ आदी मंडळांनी ढोल, ताशांच्या गजरात गणेशाची प्रतिष्ठापणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!