ईद-ए-मिलादच्या सार्वजनिक सुट्टीदिवशी शाळा सुरू ठेवणाऱ्या शाळेवर करावी करण्याची शिक्षक सेनेची मागणी

केम (संजय जाधव), दि. २९ ऑगस्ट २०२६ : ईद-ए-मिलाद निमित्त शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील महात्मा फुले विद्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित शाळा व्यवस्थापनावर तातडीने चौकशी करून नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार गुंड यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना विजयकुमार गुंड म्हणाले की, टेंभुर्णी येथील पालकांकडून या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर शिक्षक सेनेच्या वतीने संबंधित शाळा व्यवस्थापनाशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. सार्वजनिक सुट्टीचे पालन करणे सर्व शैक्षणिक संस्थांना बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच ईद-ए-मिलादचा विषय धार्मिक भावनांशी संबंधित असल्याने सामाजिक सलोखा व संवेदनशीलता लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी सूचना करण्यात आली. मात्र, त्यानंतरही “आम्ही शाळा भरवणार आहोत” असा निर्णय व्यवस्थापनाने घेतल्याचे निवेदनात नमूद आहे. त्यामुळे हा प्रकार माहितीअभावी नव्हे, तर शासनाच्या आदेशाची कल्पना असूनही जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप शिक्षक सेनेने केला आहे.
या प्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तातडीने हस्तक्षेप करण्याऐवजी प्रकरण माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा सल्ला देण्यात आल्याचे शिक्षक सेनेने म्हटले आहे. दरम्यान, मुस्लिम बांधवांकडूनही या प्रकाराचा शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने निषेध व्यक्त करण्यात येत असून संबंधित मुस्लिम संघटनेने लेखी निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे.
शिक्षक सेनेने या प्रकरणाची तातडीने चौकशी, शासनाच्या सार्वजनिक सुट्टीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित शाळा व्यवस्थापन व जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई, संबंधित दिवशीची शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती, शाळेची कागदपत्रे तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासणे, मुख्याध्यापक व संस्था चालकांकडून लेखी माफीनामा घेणे आणि भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व शाळांना स्पष्ट निर्देश देण्याची मागणी केली आहे. तसेच केलेल्या कारवाईची माहिती शिक्षक सेनेला लेखी स्वरूपात देण्याची मागणी करण्यात आली आहे.
“शासनाचे आदेश सर्व शैक्षणिक संस्थांना समानपणे लागू असताना कोणत्याही संस्थेला मनमानी करण्याची मुभा देता कामा नये. प्रशासनाने या प्रकरणी तातडीने कारवाई न केल्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा जिल्हाध्यक्ष विजयकुमार गुंड यांनी दिला आहे.

