उत्तरेश्वर कॉलेज च्या वतीने पर्यावरणीय रक्षाबंधन उपक्रम उत्साहात संपन्न

केम(संजय जाधव)श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पर्यावरणीय रक्षाबंधन उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने येथील विद्यार्थिनींनी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे ऑक्सीजन पार्क या ठिकाणी लावलेल्या झाडांना राख्या बांधल्या व त्यांचे औक्षण केले.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व झाडे लावा-झाडे जगवा हा संदेश प्रत्यक्ष कृतीमध्ये आणत येथील विद्यार्थ्यांनी झाडांना आपला भाऊ मानून वेगवेगळ्या राख्या बांधून एक सामाजिक संदेश दिला आहे.
हा कार्यक्रम प्राचार्य श्री माधव बेले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा. डॉ.संतोष साळुंखे, प्रा. एस.के.पाटील, प्रा. संतोष रणदिवे, प्रा. सतीश बनसोडे यांनी सहकार्य केले.

