कोटलिंग देवस्थान यात्रेची तयारी पूर्ण – उद्या मुख्य यात्रा उत्सव – सायंकाळी छबिना मिरवणूक निघणार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : चिखलठाण नं १ (ता.करमाळा) येथील कोटलिंग देवस्थान यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, उद्या गुरुवार 13 एप्रिल रोजी सायंकाळी छबिना मिरवणूक होणार आहे.
या यात्रेच्या निमित्ताने राज्यातील सोलापूर, सातारा, पुणे, नगर धाराशिव जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या करमाळा तालुक्यातील कोटलिंग देवाची यात्रा चैत्र कृष्ण अष्टमी म्हणजेच 13 एप्रिल रोजी छबिना मिरवणूक संपन्न होत असून या यात्रेच्या पूर्वतयारी निमित्त तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली चिखलठाण कोटलींग मंदिर येथे तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी ग्रामस्थ व यात्रा समिती यांची बैठक झाली आहे.
यात्रेदरम्यान विविध ठिकाणाहून आलेल्या यात्रेकरूंना सुखकरपणे सर्व व्यवस्था व्हावी यासाठी आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग,महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, पोलीस विभाग, पंचायत समिती,यात्रा समिती ग्रामपंचायत व ग्रामस्थांची एकत्रितपणे बैठक घेऊन अडचणी व सुचना ऐकून सर्व विभागाचा आढावा घेत यात्रा कालावधीत जबाबदारी निश्चित करून कार्यवाहीच्या सचना दिल्या.
यानुसार सर्व विभागांची तयारी पूर्ण झाली असून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.यामध्ये यात्रा कालावधीत पुरेसा पोलिस बंदोबस्त, तसेच एन.डी.आर.एफचे जवान तैनात असतील तातडीच्या उपचारासाठी ॲंब्युलंस,प्रथमोपचार व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध असतील तसेच यात्रेकरूंच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली करण्यात आली आहे.महावितरणच्या वतीने परिसरात पुरेशा प्रकाशनासाठी दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच ग्रामस्थ, यात्रासमीती व ग्रामपंचायतींच्या वतीने परिसरात स्वच्छता करण्यात आली असून स्वच्छ पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली आहे.
१३ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजल्यापासून या देवाच्या मानाच्या कावडी धार घालण्यास सुरुवात करतील,दिवसभर दंडवट,नवस फेडणे, देवदर्शन होऊन सायंकाळी साडेअकरा वाजता आरती होऊन छबिना मिरवणूक होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली या बैठकीला तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी मनोज राऊत, पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी सरपंच चंद्रकांत सरडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विकास घनवट पुजारी सचिन धारक,संतोष सरडे, राजेंद्र बारकुंड,राजिव कवितके मधुकर कांबळे नागेश सरडे,राहूल सरडे, सचिन गव्हाणे, हंबीरराव नलवडे, इंद्रजित सरडे, इलाही इनामदार, दत्ता गोळे, आत्माराम नेमाणे, पोलिस पाटील मारूती गायकवाड, ग्रामसेवक घाडगे, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.