दक्षिण आफ्रिकेतील कॉमनवेल्थ कुस्ती स्पर्धेसाठी आश्लेषा बागडेला मा.आ.संजयमामा शिंदेंची २५ हजारांची मदत!

करमाळा |संदेश प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील अंजनडोह येथील उदयोन्मुख महिला कुस्तीपटू आश्लेषा कल्याण बागडे हिची दक्षिण आफ्रिकेतील पोलोक्वाने येथे ४ ते ६ डिसेंबर २०२६ दरम्यान होणाऱ्या कॉमनवेल्थ सिनिअर कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ५९ किलो महिला वजनगटातून ती भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, तिच्या या निवडीमुळे करमाळा तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आश्लेषाने आपल्या जिद्द, मेहनत आणि कुस्ती कौशल्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. दिल्ली येथील छत्रसाल कुस्ती स्टेडियमवर पार पडलेल्या निवड चाचणीत उत्कृष्ट कामगिरी करत तिने भारतीय संघातील आपले स्थान निश्चित केले. यापूर्वी आशियाई कुस्ती स्पर्धेतही तिने देशासाठी पदक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तिच्या या यशामागे वडील कल्याण बागडे यांचे मोलाचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले आहे.

दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धेसाठी विमान प्रवास, व्हिसा, आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाचे परवाना शुल्क, निवास आणि भोजन अशा विविध बाबींसाठी एकूण २ लाख २८ हजार १५ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ग्रामीण भागातील एका होतकरू खेळाडूला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असताना आर्थिक अडचणीमुळे तिच्या आंतरराष्ट्रीय प्रवासात अडथळा येऊ नये, या सामाजिक भावनेतून माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आश्लेषाला २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता असून, त्यांना योग्य संधी आणि आर्थिक पाठबळ मिळाल्यास ते आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करू शकतात. अशा खेळाडूंच्या पाठीशी समाजातील सर्व घटकांनी उभे राहणे गरजेचे आहे, अशी भावना यावेळी संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी आश्लेषाचे वडील कल्याण बागडे यांचा सुजित तात्या बागल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.आश्लेषाच्या या निवडीमुळे अंजनडोह, राजुरीसह संपूर्ण करमाळा तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!