गुरुनानक जयंतीनिमित्त सिंधी समाजाचा सेवाभावी उपक्रम; रक्तदान शिबिरासह अन्नदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद... - Saptahik Sandesh

गुरुनानक जयंतीनिमित्त सिंधी समाजाचा सेवाभावी उपक्रम; रक्तदान शिबिरासह अन्नदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

करमाळा | संदेश प्रतिनिधी ता.२९/११
                    करमाळा येथे गुरुनानक जयंतीनिमित्त दि.२४ नोव्हेंबर रोजी सिंधी समाजाच्या वतीने रक्तदान शिबिर, अन्नदान महाप्रसाद, भजन आणि प्रवचन अशा विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना भाविकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

धार्मिक उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देत सिंधी समाजाने मानवतेचा संदेश दिला.गुरुनानक महाराज यांनी संपूर्ण मानवजातीला प्रेम, बंधुभाव, समानता आणि मानवसेवेचा संदेश दिला. त्यांचे हे विचार समाजात रुजावेत, या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, गरजू रुग्णांना त्याचा मोठा फायदा होतो, या भावनेतून अनेकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

याचबरोबर आयोजित अन्नदान महाप्रसादाचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला. भजन आणि प्रवचनाच्या कार्यक्रमातून गुरुनानक महाराज यांच्या विचारांचे महत्त्व विशद करण्यात आले. भक्तिमय भजनांनी परिसरातील वातावरण आध्यात्मिक झाले, तर प्रवचनातून सत्य, सेवा, समानता आणि मानवतेचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात आला.

या कार्यक्रमाला शैक्षणिक, सामाजिक, राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक, भाविक आणि सिंधी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!