मोरवडच्या महात्मा फुले विद्यालयात भव्य वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न!

करमाळा,संदेश प्रतिनिधी ता.२९/११
महात्मा जोतिराव फुले विद्यालय, मोरवड येथे शनिवार, दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यानिमित्त राष्ट्रीय संविधान दिन, महात्मा फुले पुण्यतिथी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ मोहोळकर यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
वक्तृत्व स्पर्धा पाचवी ते सहावी, सातवी ते आठवी आणि नववी ते दहावी अशा तीन गटांत घेण्यात आली. विद्यार्थ्यांना गटनिहाय विविध विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या प्रभावी आणि अभ्यासपूर्ण भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आजीनाथ मोहोळकर, बाळासाहेब बनगर, सचिन मोहोळकर व शिल्पा गवारी यांनी काम पाहिले, तर टाइमकीपर म्हणून विक्रम अनारसे यांनी जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गायकवाड यांनी केले, तर सचिन मोहोळकर यांनी आभार मानले.यावेळी मुख्याध्यापक नवनाथ मोहोळकर, सदाशिव मोहोळकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वसंत मोहोळकर (आबा) सह आदी ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
