उजनी बॅकवॉटर परिसरातील अन्यायकारक वीज कपात रद्द करा; शेतकऱ्यांना नियमित ८ तास वीज द्या! - Saptahik Sandesh

उजनी बॅकवॉटर परिसरातील अन्यायकारक वीज कपात रद्द करा; शेतकऱ्यांना नियमित ८ तास वीज द्या!

कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे कुगाव पंचक्रोशीतील शिष्टमंडळाची मागणी; वीज प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

करमाळा/ संदेशप्रतिनिधी :

करमाळा (ता.29) : उजनी बॅकवॉटर परिसरातील धरणग्रस्त शेतकऱ्यांवर होत असलेली अन्यायकारक वीज कपात तातडीने बंद करून शेतीपंपांसाठी नियमित व सुरळीत आठ तास वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी कुगाव पंचक्रोशीतील शिष्टमंडळाने राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे केली. रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या वीज समस्येकडे लक्ष वेधले.

उजनी बॅकवॉटर परिसरातील शेतकऱ्यांना अन्य भागांच्या तुलनेत वीजपुरवठ्याबाबत अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या वीज कपातीमुळे शेतीपंपांना पुरेसा वीजपुरवठा मिळत नसून शेतीच्या कामांचे नियोजन कोलमडत आहे. याचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादनावर होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

या पार्श्वभूमीवर उजनी बॅकवॉटर परिसरातील वीज कपात तातडीने रद्द करावी, इतर भागांप्रमाणेच येथील शेतकऱ्यांनाही समान न्याय द्यावा आणि शेतीसाठी नियमित आठ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या शिष्टमंडळाने कृषिमंत्र्यांसमोर मांडल्या. यावेळी शिष्टमंडळाने परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच वीज कपातीमुळे निर्माण झालेली परिस्थिती कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या निदर्शनास आणून दिली. शेतकऱ्यांचा प्रश्न समजून घेत त्यांनी वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक भूमिका दर्शवली आणि हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.या भेटीप्रसंगी धुळाभाऊ कोकरे, महादेव कामटे, कैलास बोंद्रे, अविनाश सरडे, इन्नुस सय्यद, शंकर बोंद्रे, सचिन गावडे यांच्यासह इंदापूर तालुक्यातील उजनी धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

शेतीसाठी पुरेशा वीजपुरवठ्याअभावी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन अन्यायकारक वीज कपात बंद करावी आणि उजनी बॅकवॉटर परिसरातील शेतकऱ्यांना नियमित आठ तास वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

error: Content is protected !!