बिबट्याचा वासरावर हल्ला – मांगी-पोथरे-कामोणे गावांमध्ये भितीचे वातावरण
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : काल (ता.९ ऑगस्ट) मांगी (ता.करमाळा) परिसरात बिबट्याने एका वासरावर हल्ला केला असून, वासरू फस्त केले आहे, या भागात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
मांगी या परिसरात ४ ऑगस्ट ला पहिल्यांदा बिबट्या दिसून आला, त्यानंतर नागरिकांच्या व परिसरातील शेतकऱ्यांच्या आग्रहाने ६ ऑगस्टला सायंकाळी मांगी हद्दीत वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा बसवला आहे, परंतु काल (ता.९) रात्रीच्यावेळी मांगी येथील शेतकरी नागेश बागल यांच्या वासरावर हल्ला करून वासरू फस्त केले आहे. या नंतर त्याच ठिकाणी बिबट्याचे ठसे दिसत आहेत.
मांगी, पोथरे, कामोणे या परिसरातील नागरिकांमध्ये तसेच शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, या बिबट्यापासून वाचवण्यासाठी या परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाला पिंजरा लावून बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याचे आवाहन केले होते, त्यानंतर वनविभागाने ६ ऑगस्टला मांगी हद्दीत एक पिंजरा बसवला, परंतु काल पुन्हा बिबट्याने हल्ला केला असल्याने या भागातील शेतकरी आता शेतात काम करण्यासाठी जाण्याच्या विचार करायचा कि नाही अशा अवस्थेत आहेत. या भागात फिरणाऱ्या बिबट्याचा वनविभागाने गांभीर्याने विचार करावा व त्याला तातडीने पकडण्यात यावे असे आवाहन मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते सुजिततात्या बागल यांनी केले आहे.
‘बिबट्या’संदर्भात आमदार शिंदे यांनी वनअधिकाऱ्यांना कॅमेरा बसविण्याच्या केल्या सूचना..