५ वर्षांच्या ब्रेकनंतर बाजार समितीवर पुन्हा एकदा जगताप गटाची सत्ता.... -

५ वर्षांच्या ब्रेकनंतर बाजार समितीवर पुन्हा एकदा जगताप गटाची सत्ता….

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – ५ वर्षांच्या ब्रेकनंतर करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार जयवंतराव जगताप गटाची पुन्हा एकदा सत्ता आली आहे. येत्या ८ ऑक्टोबरला होणारी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची २०२३ ची निवडणूक त्या आधीच आज (दि.२६) अधिकृतपणे बिनविरोध पार पडली आहे.

करमाळा बाजार समितीच्या स्थापने पासून काही अपवाद वगळता जगताप गटाचेच वर्चस्व होते. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सलग २९ वर्षे बाजार समितीचे सभापती पदी कामकाज पाहीले आहे. मागील निवडणूकीत सभापती वेळी झालेल्या बंडखोरीमुळे हाताशी आलेली सत्ता जगताप गटाने गमावली होती. ५ वर्षांच्या ब्रेकनंतर करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार जयवंतराव जगताप गटाची पुन्हा एकदा सत्ता आली आहे.

आज (२६ सप्टेंबर) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. तत्पूर्वीच २२ सप्टेंबरला आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने अकलुज येथे माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार नारायण पाटील व बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी एकत्र येत करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात जाहीर केले होते. त्यानुसार ग्रामपंचायत विभागातील चार जागा पैकी दोन जागा पाटील गटाला व दोन जागा बागल गटाला देण्याचे ठरले होते. व सहकारी संस्थेतील ११ जागा जगताप गटाला देण्याचे ठरले होते. तरी देखील अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काय होईल हे सांगता येत नव्हते. परंतू अखेर बिनविरोध करण्याच्या फॉर्म्युला नुसार ठरलेल्या उमेदवारांचे सोडून इतरांनी अर्ज मागे घेतले व निवडणूक बिनविरोध झाली.

२२ सप्टेंबर च्या जगताप-पाटील-बागल यांच्या बैठकीनंतर ही निवडणूक बिनविरोध होणार याची औपचारिकता बाकी होती. अखेरच्या क्षणी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी (२६ सप्टेंबरला) सर्व गटातील नाराज उमेदवारांना घेऊन जनशक्ती संघटना उर्वरित पंधरा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे-पाटील यांनी जाहीर केले होते परंतु शेवटी त्यांची मनधरणी झाल्यानंतर त्यांनी यातून माघार घेतली व निवडणूक बिनविरोध झाली.

  • करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती नूतन संचालक मंडळ
  • सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण : – १) जयवंतराव जगताप, २ )शंभूराजे जगताप ३ )जनार्धन नलवडे, ४) महादेव कामटे ५ ) तात्यासाहेब शिंदे , ६ ) रामदास गुंडगीरे ७) सागर दौंड
  • सहकारी संस्था मतदारसंघईतर मागासवर्गीय (ओबीसी) – शिवाजी राखुंडे
  • सहकारी संस्था मतदारसंघविमुक्त जाती भटक्या जमाती (एनटी) – नागनाथ लकडे
  • सहकारी संस्था मतदारसंघमहिला – १) सौ .शैलजा मेहेर २) सौ . साधना पवार
  • ग्रामपंचायत – सर्वसाधारण : – १) नवनाथ झोळ २) काशीनाथ काकडे
  • ग्रामपंचायतअनुसूचित जाती / अनुसूचित जमाती : बाळू चंद्रकांत पवार
  • ग्रामपंचायतआर्थिक दुर्बल घटक कुलदीप विश्वास पाटील
  • व्यापारी मतदारसंघ प्रतिनिधी – १) परेशकुमार दोशी २) मनोजकुमार पितळे
  • हमाल /तोलार प्रतिनिधी – वालचंद रोडगे

करमाळा बाजार समितीच्या २०२३ च्या निवडणूकीसाठी एकूण १५४ वैध अर्ज प्राप्त झाले होते. एकूण १८ सदस्यांच्या निवडी साठी ही निवडणूक होती. त्यापैकी व्यापारी गटातुन २ जागा  मनोज पितळे व परेशकुमार दोशी असे २ संचालक आधीच बिनविरोध निवडले होते तसेच हमाल-तोलार गटामध्ये वालचंद रोडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने तेही बिनविरोध निवडले होते. १८ पैकी ३ जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या. १५ जागेंसाठी निवडणूक होण्याची शक्यता होती.

सध्याची दुष्काळी स्थिती, निवडणुकीचा होणारा खर्च व प्रचारासाठी होणारा खर्च, मतदार व नेते यांच्यातील वाढता तणाव पाहाता नेते मंडळीनी ही निवडणूक बिनविरोध करणे गरजेचे होते. बाजार समितीच्या निवडणुकीत सतत वादावादी झालेली आहे. काही वाद समक्ष तर काही वाद न्यायालयात झाले आहेत. अशात यावर्षीची निवडणूक बिनविरोध होणे हे विशेष मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!