करमाळा बाजार समिती बिनविरोध होणार..? – मोहिते-पाटील यांची शिष्टाई कामी – सत्ता जगतापांकडेच राहणार…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चीत्त झाले आहे. पुन्हा एकदा मोहिते-पाटील यांची शिष्टाई कामी आली असून दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर ही निवडणूक बिनविरोध होत असल्याचे स्पष्ट संकेत आले आहेत. यानुसार बाजार समितीची सत्ता पुन्हा एकदा निर्वीवादपणे जगताप गटाकडे येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी, ही जनमानसातील भावना होती. त्याबाबत सा.संदेश यांने वारंवार लिहिले होते. जनमानसातील भावनेची कदर करत तालुक्यातील नेत्यांनी विशेषत: बागलगट व पाटीलगट यांनी दोन पावले मागे येत मोहिते-पाटील यांचा शब्द मान्य करत ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबत मान्यता दिल्याचे समजते. आमदार संजयमामा शिंदे यांनी यापुर्वीच आपले सहकारी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्याकरिता पाठींबा देणार असल्याचे म्हटले होते. त्याप्रमाणे त्यांचे कार्यकर्त्यांनी अर्ज मागे घेऊन जगताप यांना बिनशर्त पाठींबा दिला आहे.

पाटील गटाचे नेते माजी आमदार नारायण (आबा) पाटील, बागल गटाचे नेते दिग्विजय बागल, जगताप गटाचे नेते जयवंतराव जगताप यांची अकलूज येथे रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात २२ सप्टेंबरला दुपारी बैठक झाली. त्यावेळी बाजार समिती निवडणूक सामंजस्याने बिनविरोध करण्यावर चर्चा झाली. यावेळी वेगवेगळे विषय चर्चेले असलेतरी सध्या ही निवडणूक बिनविरोध करण्यावर तिघा नेत्यांचे एकमत झाले. त्यानुसार ग्रामपंचायत विभागातील चार जागा पैकी दोन जागा पाटील गट व दोन जागा बागल गटाला देण्याचे ठरले. उर्वरीत जागा जगताप गटाला दिल्या आहेत, असे समजते. नेत्यांमध्ये तडजोड झाली असलीतरी असमाधानी कार्यकर्त्यांमुळे नेमके काय घडणार ? हे २६ सप्टेंबरलाच कळेल !

जिथे तलवारीची लढाई झाली तिथे फुलांची उधळण! – बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झालीतर तो एक नवा इतिहास ठरणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीचा जुना इतिहास पाहता सतत वादावादी झालेली आहे. कधी समोरासमोर तर कधी न्यायालयात संघर्ष झाला आहे. दिवाणी न्यायालयापासून सहकारी न्यायालयापर्यंत तर जिल्हा सहकारी कोर्टापासून ते उच्च न्यायालयापर्यंत संघर्ष झालेले आहेत. जिथे तलवारीची लढाई झाली तिथे फुलांची उधळण होणं म्हणजे नव्या पिढीसाठी एक आदर्शाचा मार्ग दाखवल्याचे चित्र दिसेल. बाजार समितीच्या निवडणुकीत यापूर्वी मोहिते-पाटील यांचे पाठबळाने विरोधकांनी निवडणुकीत आव्हान उभे केले होते. आज याउलट त्यांच्या हस्तक्षेपामुळेच ही निवडणूक बिनविरोध होत आहे हे विशेष!

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!