पर्यायी रस्ता असूनही मांगी गावातून गाळ वाहतूक करणाऱ्या अवजड डंपर मुळे नागरिक हैराण

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – यावर्षी मांगी तलाव पूर्ण कोरडा पडल्यामुळे मांगी तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करून वाहतूक केली जात आहे.. मोठे मोठे हायवा डंपर मध्ये हा गाळ प्रमाणापेक्षा जास्त भरून हे डंपर मांगी गावातून वाहतूक करत आहेत. विशेष म्हणजे या वाहतुकीला मांगी येथील डाव्या कालव्याच्या बाजूने रस्ता असूनही हे डंपर गावातूनच वाहतूक करत आहेत.
या डंपरमध्ये भरलेला गाळ अक्षरशः नागरिकांच्या अंगावर पडत आहे रस्त्यावरून ,ये ,जा करणाऱ्या नागरिकांना व दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून नव्यानेच बांधलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिराला या 24 तास होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात हादरे बसत आहेत.
परवा झालेल्या पावसामुळे येथील पुला लगत डंपर मधून पडलेल्या गाळामुळे रस्त्यावरती घसरन झाली होती यामुळे अनेक दुचाकी वाहन घसरून पडून वाहन चालक जखमी झालेले आहेत .
मांगी गावातून डंपरची 24 तास वाहतूक सुरू आहे . यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून आबाल वृद्धांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार आहेत .तरी मांगी ग्रामपंचायत ने या याकडे तात्काळ लक्ष घालून गाळ वाहतूक करणाऱ्या ,ट्रॅक्टर, डंपर ,यांना डाव्या कॅनॉलच्या रस्त्यावरून वाहतूक करण्याच्या सूचना द्याव्यात.
–अशोक नरसाळे
मांगी येथील नव्यानेच बांधण्यात आलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळून ही मोठ्या हायवा डंपरची 24 तास वाहतूक हाेत असल्यामुळे मंदिराला हादरे बसत असून तडे जाण्याची शक्यता आहे याकडे मांगी ग्रामपंचायत ने तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा ग्रामस्थ कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही.
– भैरवनाथ बागल


