डॉल्बीच्या दणदणाटामुळे करमाळ्यात एकाचा बळी !

करमाळा (दि.२५) – डॉल्बीच्या आवाजाने हृदयाचे ठोके वाढल्यामुळे करमाळा शहरातील चिकन व्यावसायिक खलील मुलाणी (वय ४५) यांचे निधन झाल्याची घटना घडली आहे.
ईद-ए-मिलाद च्या निमित्ताने करमाळा शहरात २३ सप्टेंबर रोजी मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीसाठी सोलापूर येथील प्रसिद्ध डॉल्बी सिस्टीम आणण्यात आली होती. या मिरवणुकीत खलील मुलांनी सहभागी झाले होते. डॉल्बीच्या प्रचंड आवाजाने त्याचे हृदयाचे ठोके वाढल्यानंतर त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर बरे वाटू लागल्यावर ते घरी आले व काहीवेळात त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला व त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मुलाणी यांना आधीच बीपी आणि शुगरचा त्रास होता. ते मिरवणूकीत सहभागी होत नव्हता पण काही मित्रांच्या आग्रहास्तव सत्कार स्वीकारण्यासाठी मिरवणुकीत सहभागी झाला होते. पंधरा दिवसांनी त्यांच्या मुलीचे लग्न होणार होते त्यासाठी त्यांनी जय्यत तयारी देखील असल्याचे समजले. मात्र डॉल्बीच्या आवाजाच्या दणक्याने त्यांचा बळी घेतला.
मुलाणी यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी व आई,भाऊ, बहीण असा परिवार आहे. खलील यांनी वडिलांच्या निधनानंतर अत्यंत प्रतिकूल गरीब परिस्थितीत अगदी कमी वयात संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अंगावर घेऊन आपला चिकन विक्रीचा व्यवसाय भाजी मंडई परिसरात सुरू करुन कुटुंबाला संभाळत होते.

डॉल्बी सिस्टीम मुळे करमाळातील मौलाली माळावरील एका तरुणाचा यापूर्वीच असाच मृत्यू झाला होता. हिवरवाडी येथील एका तरुणाला बहिरेपण आले आहे.डॉल्बी सिस्टीमचे प्रचंड दुष्परिणाम असताना स्वतःचे व मंडळाचे अस्तित्व दाखवण्यासाठी असे कार्यक्रम आणले जातात. या मिरवणुकीसाठी आलेल्या डॉल्बी सिस्टीमच्या मालकावर सुदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करावा. या मिरवणुकीच्या आयोजकांचे जाब जबाब घ्यावेत अशी मागणी सुजाण नागरिकांतून होत आहे.
यापूर्वी गणेशोत्सव मिरवणुकीत तसेच अनेक महापुरुषांच्या जयंतीच्या मिरवणुकीत असे डॉल्बी सिस्टीम शहरात आणले जातात. शहरात डॉल्बीच्या आवाजावर मर्यादा आणावी यासाठी करमाळ्यातील क्षितिज ग्रुपच्या महिला सदस्यांनी मागच्या महिन्यात करमाळा पोलीस स्टेशनला निवेदन दिले होते.
डॉल्बीच्या आवाजावर मर्यादा आणावी – क्षितिज ग्रुपच्या वतीने निवेदन
माणूस नियमित संवाद साधतो तेव्हा आवाज ४० ते ५० डेसिबल असतो. आपले कान ७० डेसिबल या मर्यादेपर्यंतचा आवाज सहन करू शकतात. ८० ते १०० डेसिबलचा आवाज सतत कानावर पडत राहिल्यास ऐकण्याची क्षमता कमी होते. डॉल्बीचा आवाज ९० ते १०० डेसिबल असतो. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे शरीरावर अनेक गंभीर परिणाम होतात. श्रवणशक्ती गमावणे, एकाग्रतेवर परिणाम, मानसिक समस्या निर्माण होणे यांसह माणूस चिडखोर आणि हिंसक होतो आहे. कायमचा बहिरेपणाही येऊ शकतो.








