डॉल्बीच्या आवाजावर मर्यादा आणावी – क्षितिज ग्रुपच्या वतीने निवेदन
करमाळा (दि.५) – ‘डॉल्बीच्या आवाजाचा दणदणाट’ ही एक ज्वलंत समस्या असून ठराविक मर्यादेच्या पुढे आवाज केल्यास त्यावर प्रतिबंधात्मक उपाय केले जावेत अशा मागणीचे निवेदन क्षितिज ग्रुपच्या सदस्यांनी करमाळा पोलीस निरीक्षक विनोद घुगे व नायब तहसीलदार यांच्या मार्फत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा येथील समाज अतिशय उत्सव प्रिय समाज असून इथे निरनिराळे सण,समारंभ ,सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होतात. परंतु त्यावेळेस ज्या मिरवणुका काढल्या जातात, त्या मिरवणुकांमध्ये डॉल्बी, डीजे यांचे आवाज इतके प्रचंड मोठे असतात की त्यामुळे इमारती अक्षरशः हादरतात, भिंतींना तडे जातात .इतकेच नव्हे तर माणसांच्या आरोग्यावर देखील त्याचा विपरीत परिणाम होत आहे. या आवाजामुळे कानाच्या पडद्यांना इजा होते, प्रसंगी कायम स्वरूपी बहिरेपणा देखील येतो. हृदयविकाराचा धोका देखील संभवतो. हा एक सामाजिक प्रश्न असून त्या विरोधात करमाळ्यातील क्षितिज ग्रुप ह्या सामाजिक काम करणाऱ्या महिला संघटनेने एक पाऊल उचलले आहे. ह्या आवाजावर मर्यादा यावी अशी मागणी केली आहे.
या निवेदनावर करमाळ्यातील पाचशेहून अधिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या देऊन निवेदनाला पाठिंबा दिला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक घुगे यांनी क्षितिज ग्रुपच्या सदस्यांशी समाजातल्या अनेक प्रश्नांवर चर्चा केली. तसेच क्षितिज ग्रुपच्या उपक्रमांचे कौतुक करून अभिनंदनही केले .आणि दिलेल्या निवेदनाचा अतिशय गांभीर्याने विचार करून योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासनही दिले. मा. शिल्पा ठोकडे यांनी सुद्धा या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे . अशा उपक्रमांसाठी कायद्याबरोबरच समाजप्रबोधनाची देखील गरज आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी क्षितिज ग्रुपच्या माधुरी परदेशी, नलिनी जाधव, पुष्पा फंड, निलिमा पुंडे,मंजू देवी, माधुरी साखरे आणि डॉ. सुनिता दोशी आदीजन उपस्थित होत्या.