वारंवार मागणी करूनही गतिरोधक न बसवल्यामुळे मांगी गावातील ग्रामस्थ आक्रमक -

वारंवार मागणी करूनही गतिरोधक न बसवल्यामुळे मांगी गावातील ग्रामस्थ आक्रमक

0
संग्रहित छायाचित्र

करमाळा(दिनांक ३०): नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अहिल्यानगर–टेंभुर्णी महामार्गावर मांगी गावाजवळ गतिरोधक बसवण्यात यावा, अशी मागणी मांगी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

या मार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. अहिल्यानगर ते जातेगाव हा रस्ता चारपदरी करण्यात आला असला तरी पुढील जातेगाव ते करमाळा हा रस्ता अद्याप दोनपदरीच आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहने वेगाने धावतात. मांगी गावातून बसथांब्यावर जाण्यासाठी ग्रामस्थांना रस्ता क्रॉस करून जावे लागत असून वाहनांच्या सुसाट वेगामुळे महिला, वृद्ध, शाळकरी मुले आणि इतर नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत असल्याची स्थिती आहे.

या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात घडले असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. ग्रामस्थांनी अनेक वेळा गतिरोधक बसवण्याची मागणी केली असली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान, वारंवार मागणी करूनही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून, लवकरात लवकर गतिरोधक बसवले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल मांगी गावचे रहिवासी प्रवीण अवचर यांनी केला आहे. या रस्त्यावर यापूर्वीही अनेक अपघात झालेले आहेत. तसेच या मार्गावरून पुनवर, उत्तर-दक्षिण वडगाव, पोथरे आदी गावांकडून ये-जा करणाऱ्या वाहनांसह प्रवाशांचीही मोठी वर्दळ असते. प्रत्येक वेळी अपघात झाल्यानंतर किंवा एखाद्याचा मृत्यू झाल्यावरच प्रशासन जागे होते, असा अनुभव देवळाली आणि जातेगाव येथील नागरिकांना आला आहे. त्या ठिकाणीही पूर्वी गतिरोधक नसल्याने अपघातांची मालिका सुरू होती; मात्र ग्रामस्थांच्या मागणीनंतर तेथे दोन्ही बाजूंनी गतिरोधक बसवण्यात आले आहेत. मग हाच रस्ता मांगी गावाजवळून जात असताना, वारंवार मागणी करूनही येथे गतिरोधक का बसवले जात नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. लवकरात लवकर गतिरोधक बसवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

प्रवीण अवचर, गायक/पत्रकार, मांगी

मी मांगी गावचा ग्रामस्थ या नात्याने नागरिकांच्या भावनांचा नक्कीच आदर करतो आणि त्यांची मागणी रास्त आहे. माझ्यापर्यंत या घटनेची माहिती मिळताच मी तत्काळ सोलापूर येथील संबंधित विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली आहे.
महामार्ग असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी येत असल्या तरी हा गंभीर विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दिग्विजय बागल, भाजप नेते


गेली अनेक वर्षे ग्रामस्थांची मागणी असूनही हा गंभीर विषय प्रलंबित ठेवणे ही प्रशासनाची मोठी चूक आहे. रहदारी व नागरिकांची वर्दळ असणाऱ्या रस्त्यांवर गतिरोधक असणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यामुळे अपघातांना आळा बसतो. या संदर्भात माहिती घेऊन मी प्रत्यक्ष सोलापूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून लेखी अर्ज सादर केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर मांगी बसथांब्याजवळील रस्त्यावर गतिरोधक बसवण्याबाबत आश्वासन दिले आहे.

सुजित बागल, ग्रामपंचायत सदस्य, मांगी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!