व्यावसायिक खलील मुलाणी यांचे निधन
करमाळा (दि.२५) – करमाळा शहरातील चिकन व्यावसायिक खलील गुलाम मुलाणी यांचे सोमवारी (दिनांक २३ सप्टेंबर रोजी) हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. मृत्यू समयी त्याचे वय वर्षे ४५ होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी व आई,भाऊ, बहीण असा परिवार आहे.
खलील यांनी वडिलांच्या निधनानंतर अत्यंत प्रतिकूल गरीब परिस्थितीत अगदी कमी वयात संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अंगावर घेऊन आपला चिकन विक्रीचा व्यवसाय भाजी मंडई परिसरात सुरू करुन कुटुंबाला संभाळत होते. चिकन विक्रीच्या व्यवसायातून जिद्दीने कष्ट करत मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती करुन उद्योजक म्हणून अत्यंत कमी कालावधीत नावारुपाला आले होते. याच व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर मित्रांचा गोतावळा तयार करून प्रत्येक धर्मातील सामाजिक कार्यात सहभागी होऊन ते मुस्लीम समाजा बरोबर इतर समाजातही लोकप्रिय झाले होते गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, विधवा महिलांच्या मुलींच्या लग्नासाठी, आजारी व्यक्तींकरिता सदैव मदतीचा हात पुढे असायचा.
त्यांचें सामाजिक कार्याचे गुण पाहून सावंत गटाचे नेते सुनील सावंत व संजय सावंत या दोन बंधुनी करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मधुन नगरसेवक पदाची उमेदवारी दिली होती परंतु अत्यंत कमी मतांच्या फरकाने निवडणुकीत पराभव झाला होता.
पैगंबरवासी खलील भाई मुलाणी यांच्या अशा अकाली जाण्याने सर्व समाजातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.