दूध अनुदान योजनेतील दुसऱ्या टप्प्याचे अनुदान जमा – गणेश चिवटे
करमाळा (दि.२५) – राज्य सरकारने जाहीर केलेल्या दूध अनुदान योजनेनुसार दुसऱ्या टप्प्याचे दूध अनुदान आजपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती सोलापूर जिल्हा भाजपचे सरचिटणीस श्री गणेश चिवटे यांनी दिली आहे.
दूध खरेदी दरात मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याने राज्य सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. यापैकी पहिल्या टप्प्यात 11 जानेवारी ते 10 मार्च असे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर यापूर्वी जमा झाले आहे.
मात्र दुसऱ्या टप्प्याचे अनुदान जमा होणे बाकी होते. दुसऱ्या टप्प्या तील जुलै 2024 ते सप्टेंबर 2024 असे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. यापैकी जुलै महिनयातील दुधाचे अनुदान आज पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
परवा झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार या दूध अनुदान योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये ऐवजी सात रुपये अनुदान देण्यात येणार आहे. ही नवीन अनुदान योजना एक आक्टोबर पासून लागू होणार आहे. सदर दुधाचे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आपण महसूल व दुग्धविकास मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार हे अनुदान जमा झाल्याची माहिती श्री गणेश चिवटे यांनी दिली आहे.