‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम कौतुकास्पद – प्रा. अनिल साळुंखे

करमाळा (दि.४) : वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून या उपक्रमाद्वारे निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड किंवा छंद तयार होऊन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होणार आहे. असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक अनिल साळुंखे यांनी व्यक्त केले. करमाळा येथील प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात श्री साळुंखे बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. व्ही. देशमुख होते. त्यांच्याच हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेतील यावेळी कॉलेज महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

पुढे बोलताना श्री साळुंखे म्हणाले की, “वाचन संस्कृती चळवळ जोपासायची असेल तर विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात येऊन क्रमिक पुस्तकांशिवाय अवांतर वाचनाची पुस्तके म्हणजेच ऐतिहासिक कादंबऱ्या, आत्मचरित्रे, प्रवासवर्णने, कविता, वर्तमानपत्र, इ. नियमित वाचायला पाहिजे”.
या उपक्रमांतर्गत महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन घेण्यात आले. ग्रंथ प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके ठेवण्यात आली होती. त्यामुळे ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या अवांतर पुस्तकांची माहिती विद्यार्थ्यांना झाली. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 01/01/2025 रोजी या उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन आणि वाचन कौशल्य कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी सहभागी झाले. त्यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना वाचन करण्यासाठी प्रेरित केले. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार या कार्यक्रमाचे समन्वयक ग्रंथपाल प्रा. ए. व्हि. गायकवाड यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




