रस्त्याच्या कडेला लावलेल्या ट्रकची रात्रीत चोरी

करमाळा (दि.४): रात्रीच्या वेळी बंद पडल्याने रस्त्याच्या कडेला लॉक करून ठेवलेल्या ट्रकची रात्रीत चोरी झाल्याची घटना श्रीदेवीचामाळ (ता.करमाळा) येथे घडली आहे. करंजे येथील तुषार आनंद गायकवाड यांनी करमाळा पोलीस स्टेशनमध्ये या चोरीची फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीमध्ये गायकवाड यांनी म्हटले आहे की, २२ डिसेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास मी आमचा मालट्रक (एम एच ४५ ए एफ ८८५९) घेऊन मांगीकडे कांदा माल भरण्यासाठी निघालो होतो. श्रीदेवीचामाळ (करमाळा) जवळ असलेल्या कागद कारखान्याजवळ बंद पडला होता.
रात्रीच्या वेळी दुरुस्तीसाठी मेकॅनिक न भेटल्यामुळे आहे. त्या ठिकाणी ट्रक लॉक करून घरी गेलो. दुसऱ्या दिवशी दि. २३ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ट्रक लावलेल्या ठिकाणी गेलो असता ट्रक दिसून आला नाही. आसपास सर्वांकडे चौकशी केली परंतु काहीच माहिती मिळाल्याने ट्रक चोरीला गेल्याचे लक्षात आले व करमाळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. पुढील तपास पो.हे.कॉ. पांडुरंग आरकिले हे करत आहेत.




