१४ वर्षांच्या मुलाच्या सतर्कतेमुळे एसटी मधील प्रवाशांचे प्राण वाचले

करमाळा(दि.२५) : शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागलेल्या एसटीतील २० प्रवाशांचे प्राण करमाळा येथील १४ वर्षांच्या मुलाच्या सतर्कतेमुळे वाचले आहेत. ही घटना काल दिनांक २४ जानेवारी रोजी मिरजगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथे घडली.

हकीकत अशी आहे की, नाशिक वरून सोलापूरला जाणाऱ्या एसटी बसला मिरजगाव येथे आल्यानंतर अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. या एसटी मध्ये प्रवास करणाऱ्या करमाळा येथील देवांश सागर वडे (वय १४) या मुलाला पाया खालून धूर येऊ लागल्याचे दिसून आले. त्याने तातडीने ही बाब एसटी ड्रायव्हरच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर एसटी ड्रायव्हरने ही बस जागीच थांबवली. सागरने त्यानंतर एसटी प्रवाशांना सतर्क करून एसटी मधून खाली उतरण्यास सांगितले. एसटीतील प्रवाशांनी लगबगीने एसटीतून खाली उतरले व एसटीने क्षणात पेट घेऊन अख्खी बस जळाली या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी एसटी प्रवाशांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. अग्निशमन यंत्रणेला यायला उशीर झाल्याने तोपर्यंत एसटी जळून खाक झाली होती या दुर्घटनेची माहिती एसटीचे प्रशासकीय अधिकारी यांनी जाऊन पाहणी केलेली आहे. देवांश वडे या मुलाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.






